वेध माझा ऑनलाइन
कराड
रोटरी क्लब ऑफ कराड चारीटेबल ट्रस्ट व रोटरी क्लब ऑफ कराड यांच्या वतीने स्व. सौ. वेणूताई यशवंतराव चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड (कॉटेज हॉस्पिटल) या ठिकाणी असणाऱ्या आंतररुग्ण यांच्या प्रत्येकी एका नातेवाईकाला मोफत जेवणाची व्यवस्था करून देण्यात आली आहे या उपक्रमाचे औपचारिक उदघाटन आज शुक्रवार, दिनांक 14 रोजी सकाळी 10 वाजता नामदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते तसेच तहसीलदार अमरदीप वाकडे, कोटेज हॉस्पिटलचे डॉ. प्रकाश शिंदे व रोटरी सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
रोटरी क्लब ऑफ कराड या सामाजिक संघटनेने कराड शहरामध्ये 65 वर्षाहून अधिक कालापासून शैक्षणिक, वैद्यकीय, पर्यावरण, स्वच्छता, आर्थिक आणि सामुदायिक विकास, माता आणि मुलांचे आरोग्य, क्रीडा अशा विविध क्षेत्रांमध्ये निरंतर विविध उपक्रम राबवून, आपल्या कार्याचा ठसा उमटवलेला आहे. कराड येथील कॉटेज हॉस्पिटल मध्ये गरजू व गरीब असेच रुग्ण येत असतात. यामध्ये बहुतांश रुग्ण हे बाहेर गावचे असून त्यांच्यासोबत त्यांचा नातेवाईक ही असतो. रुग्णालयामधील सर्व रुग्णांना हॉस्पिटलच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था शासनाकडून करण्यात आली आहे. पण रुग्णांच्या सोबत आलेल्या नातेवाईकाच्या जेवणाची सोय ज्याने त्यानेच करण्याची आहे.
सध्या कोविडची परिस्थिती अत्यंत गंभीर असून, कोविड पेशंटच्या नातेवाईकांना रुग्णालयात थांबून घेतले जात नाही. पण नॉन-कोविड रुग्णांच्या नातेवाईकांची आजच्या परिस्थितीमध्ये प्रचंड फरपट होते. आणि त्यांना किमान जेवणा सारख्या विषयाकरिता झगडावे लागते. याच समस्येवर उत्तर देण्याच्या उद्देशाने रोटरी अन्नछत्र सेवा ही योजना सुरू करण्यात आली आहे. सदरचे जेवण आरोग्यदायी व चविष्ट तसेच प्रत्येकाला पोटभर मिळावे याकरिता त्यामध्ये दोन चपात्या, भाजी, वरण, भात, लोणचे याचा समावेश करण्यात आला असून, योग्य प्रकारच्या डिस्पोजेबल पॅकिंग मध्ये लाभार्थ्यांना हे जेवण दिले जाईल.
सदरचा उपक्रम सध्याच्या लॉकडाऊन किंवा कोविड पुरता मर्यादित न ठेवता तो अखंड व कायमस्वरूपी चालवण्याचा रोटरीचा प्रयत्न आहे अशी माहिती रोटरी क्लब ऑफ करडच्या वतीने देण्यात आली. या उपक्रमाकरिता लागणाऱ्या निधी करिता रोटरीच्या सर्व सदस्यांनी स्वतः आणि आपल्या मित्र परिवाराच्या सहकार्याने मदत जमा करण्याचे कार्य सुरू केले आहे. रोटरीच्या वतीने समाजातील सर्व स्तरांमधील नागरिकांकडून अन्नदाना करिता शक्य ती मदत व निधी जमा करून समाजातील गोरगरीब व गरजू लोकांकरिता अन्नदानाचा उपक्रम राबवणे हे निश्चितच कौतुकास्पद असल्याचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी यावेळी सांगितले.
या रोटरी अन्नछत्र सेवा कार्याच्या शुभारंभप्रसंगी गरजूंना जेवणाचे पॅकेट माननीय नामदार बाळासाहेब पाटील, तहसीलदार अमरदीप वाकडे, कॉटेज हॉस्पिटलचे डॉक्टर प्रकाश शिंदे व इतर मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
No comments:
Post a Comment