वेध माझा ऑनलाइन
कराड
कोरोनाच्या अगदी पहिल्या टप्प्यापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कराड मधील कार्यकर्ते निस्वार्थी भावनेने समाजासाठी योगदान देत आहेत.अशावेळी सत्य परिस्थितीचा कोणताही आढावा न घेता राजकीय हेतून प्रेरित होऊन संघाची अकारण बदनामी करण्याचा प्रयत्न झाला आहे असा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह श्रीकांत एकांडे व संदीप कुलकर्णी यांनी पत्रकाद्वारे केला आहे
दोन दिवसांपूर्वी येथील कॉटेज हॉस्पिटल येथे लसीकरण चालू असताना आर एस एस चे कार्यकर्ते राजकीय अजेंडा वापरत त्याठिकाणी काम करत असल्याचा आरोप काँग्रेस नेते शिवराज मोरे यांनी केला होता तेथील अधीक्षक डॉ शिंदे यांच्याकडे त्याबाबत त्यांनी तक्रार करत त्या ठिकाणचे काम थांबवले होते याला श्रीकांत एकांडे व संदीप कुलकर्णी यांनी पत्रकाद्वारे उत्तर दिले आहे
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटल आहे की, कोरोनाच्या या आव्हानात्मक काळात आपले प्रशासकीय अधिकारी, सरकारी रुग्णालयातील डॉकटर्स, परिचारक व अन्य कोव्हिड योद्धे यांच्या मदतीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सदैव तत्पर आहे. प्रत्येक राष्ट्रीय आपत्तीमध्ये संघ स्वयंसेवक नेहमीच प्रशासनाच्या मदतीस धावून आले आहेत. यावेळी सुद्धा आपल्या देशातील 18 ते 44 वयोगटातील नागरीकांची लक्षणीय संख्या पाहता लसीकरण केंद्रांवर प्रशासनाच्या मदतीसाठी केवळ सेवाकार्याच्या भावनेने संघ स्वयंसेवक पुढे आले. कराडच्या स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाची रितसर परवानगी घेऊन गेले 3 दिवस सदर लसीकरण केंद्रावर संघ स्वयंसेवक रुग्णालय प्रशासनाला मदत करत होते. यामध्ये लसीकरण केंद्र सहायता कक्ष, नाव नोंदणी, ज्येष्ठ नागरिकांना सहकार्य, गर्दी नियंत्रण, यामध्ये संघ स्वयंसेवक स्वतःचा जीव धोक्यात टाकून येणाऱ्या नागरिकांना मदत करत होते.
संघ स्वयंसेवकांच्या मदतीमुळे लसीकरण केंद्रावर कार्यरत कर्मचारी तसेच रुग्णालय प्रशासनावरील ताण हलका होण्यास निश्चितच मदत झाली आहे. लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी सद्य परिस्थितीत नागरिकांच्या आरोग्यास देखील हानिकारक आहे. तसेच संघ स्वयंसेवकांमुळे नागरिकांच्या शंकांचे समाधान योग्य पद्धतीने होत असल्याने आणि नागरिकांचा वेळ वाचत असल्याने अनेक नागरिकांनी या कार्याचे कौतुक देखील केले आहे. त्यामुळे नागरिक आणि स्वयंसेवक यामध्ये वादावादी झाली असे म्हणणे चुकीचे आहे.
याबरोबरच लसीकरण नोंदणी, तिथे लागणारा नंबर ही पूर्णतः पारदर्शक प्रकिया आहे. 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना ऑनलाईन अपॉइंटमेंट नुसारच नंबर लागत आहे. याचबरोबर फ्रंटलाईन वर्कर्स आणि ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाविषयी रुग्णालय प्रशासनाचे धोरण पूर्णतः पारदर्शक आहे. अशावेळी संघ स्वयंसेवक तोंड पाहून लस देतात हा आरोप हास्यास्पद आहे रा. स्व. संघाच्या कोरोना काळातीत सेवाकार्याला अनावश्यक गालबोट लावण्याचा हा गलिच्छ प्रयत्न काही समाज कंटकांनी केला आहे.
सध्या आपला संपूर्ण देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. त्यामध्ये सर्वजण आपल्या पूर्ण ताकदीने या संकटाचा प्रतिकार करत आहेत. आज डॉकटर्स, परिचारक, स्वच्छता दूत, पोलिस विभाग आणि सर्व कोरोना योद्धे तसेच प्रशासन यांना समाजाच्या तसेच अनेक सेवाभावी संस्थांच्या सहकार्याची गरज आहे.
अशावेळी अनावश्यक राजकारण आणि वैयक्तिक स्वार्थ मध्ये न आणता समाजातील अधिकाधिक घटकांनी एकत्र येऊन आपल्या समाजासाठी योगदान देऊया आणि कोरोनाच्या या संकटावर मात करूया असे आवाहन देखील एकांडे आणि कुलकर्णी यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment