वेध माझा ऑनलाइन
करोनापाठोपाठ महाराष्ट्राला Mucormycosis अर्थात काळी बुरशी या आजाराचा देखील फटका बसला असून त्याचा सामना करण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. “राज्यात सध्या म्युकरमायकोसिसचे ८०० ते ८५० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. या आजाराच्या रुग्णवाढीचा वेग पाहाता आपल्याला आत्ता २ लाख इंजेक्शन्सची गरज आहे. आपण त्यासाठी प्रयत्न करत असून हा साठा ३१ मेनंतर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पुढचे १० दिवस महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे आणि काळजीचे असणार आहेत”, अशा शब्दांत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच, यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्राला या इंजेक्शनच्या वाटपामध्ये झुकतं माप द्यायला हवं, अशी देखील मागणी त्यांनी यावेळी केली
“पुढचे १० दिवस आपल्यासाठी फार महत्त्वाचे आहेत. या दिवसांमध्ये औषधांचा, इंजेक्शनचा कसा पुरवठा होईल, ते महत्त्वाचं ठरणार आहे. मी स्वत: केंद्र सरकारच्या संबंधित विभागांशी बोललो आहे. याचा कच्चा माल साराभाई कंपनीकडून घेऊन आपण वर्धा आणि पालघरमधल्या उत्पादकांना देऊन हे इंजेक्शन बनवून घेण्याची तयारी दाखवली आहे. त्यासाठी २ किलो कच्चा माल पुरवण्याचं त्यांनी मान्य केलं आहे. एका किलोमध्ये २० हजार इंजेक्शन तयार होतात. त्या माध्यमातूनही इंजेक्शन मिळवण्याचा आपला प्रयत्न आहे”, असं राजेश टोपे यावेळी म्हणाले. म्युकरमायकोसिस आजाराचा सामना करण्यासाठी राज्य सरकारकडून उचलल्या जाणाऱ्या पावलांविषयी ते प्रसारमाध्यमांना
माहिती देत होते.
कोणतंही रेशनकार्ड असणाऱ्यांना मोफत उपचार
दरम्यान, यावेळी महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत कोणतंही रेशनकार्ड असणाऱ्या व्यक्तींना म्युकरमायकोसिसवरचे मोफत उपचार मिळतील, असं देखील राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. “महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये ज्यांच्याकडे कुठलंही रेशनकार्ड आहे, त्यांना या आजारावरचा उपचार मोफत मिळणार आहे. इएनटी, डेंटिस्ट, ऑप्थोमोलॉजिस्ट, न्यूरोलॉजिस्ट, प्लॅस्टिक सर्जन असे लागतात. या सर्जरी या आजारासाठी कराव्या लागतात. या योजनेतून प्रत्येकाच्या कुटुंबाला दीड लाख रुपयांचा कव्हर मिळतो. पण राज्य सरकारने जाणीवपूर्वक जो काही खर्च उपचाराला येईल, त्याची व्यवस्था केली आहे”, असं ते म्हणाले.
No comments:
Post a Comment