Tuesday, May 20, 2025

विदेशी जाणाऱ्या शिष्टमंडळात ठाकरेंच्या खासदाराला स्थान; दिल्लीतून उद्धव ठाकरेंना फोन... काय म्हणाले केंद्रीयमंत्री ?

वेध माझा ऑनलाइन।
पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थिती आणि सैन्य दलाच्या कारवाईसंदर्भात जगभरातील विविध देशांत जाऊन सत्यता व माहिती देण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. त्यासाठी, सर्वपक्षीय खासदारांचे शिष्टमंडळ तयार करण्यात आले असून शिवसेना शिंदे गटाकडून खासदार श्रीकांत शिंदे यांचा सहभाग झाला आहे. मात्र, शिवसेना ठाकरे गटाकडून एकाही खासदाराचा सहभाग या शिष्टमंडळात करण्यात आला नव्हता. त्यावरुन, खासदार संजय राऊत यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती. संसदेतील आपल्या खासदारांचं संख्याबळ सांगत त्यांनी महाविकास आघाडीतील पक्षात भेदभाव केल्याचेही म्हटले होते. त्यानंतर, आता केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करुन सर्वपक्षीय शिष्टमंडळ संदर्भात माहिती दिली. तसेच, या शिष्टमंडळात शिवसेना युबीटी पक्षाच्या खासदाराचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.  केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी काल उद्धव ठाकरे जी यांच्याशी या शिष्टमंडळासंदर्भात दूरध्वनीवरून संवाद साधला. देशाचे हे शिष्टमंडळ दहशतवादाविरुद्ध आहे आणि याची खात्री मिळाल्यावर, आम्ही सरकारला आश्वासन दिले आहे की आम्ही या शिष्टमंडळाद्वारे आपल्या देशासाठी जे योग्य आणि आवश्यक ते करू इच्छितो. त्यानुसार, खासदार प्रियंका चतुर्वेदी देशभरातील इतर खासदारांसह या शिष्टमंडळाचा भाग असतील, असे शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे, या शिष्टमंडळात शिवसेना युबीटीकडून खा. प्रियंका चतुर्वेदी यांची वर्णी लागली आहे.

No comments:

Post a Comment