Monday, August 17, 2026

कराडच्या सोमवार पेठेत भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात महाविद्यालयीन युवती जखमी; ऍड विराज जांभळे व बाळासाहेब उमराणी यांनी युवतीची कुत्र्याच्या तावडीतून केली सुटका ; याबाबत पालिका प्रशासनाला कळवून देखील दुर्लक्ष केल्याचा सामाजिक कार्यकर्ते अजय उंडाळकर यांचा आरोप ;

वेध माझा ऑनलाईन।
सोमवार पेठेतील शिखरे वाड्यासमोर भटक्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात एका महाविद्यालयीन युवतीला दुखापत झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. याच कुत्र्याने एका वृद्ध महिलेवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते अजय उंडाळकर यांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार पेठेतील अनिल कुलकर्णी यांची कन्या तिच्या आईसोबत घरी जात असताना शिखरे वाड्यासमोर अचानक तेथील भटक्या कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात युवतीच्या हाताला व पायाला दुखापत झाली.
घटनास्थळी उपस्थित असलेले ॲड. विराज जांभळे आणि माजी नगरसेवक बाळासाहेब उमराणी यांनी प्रसंगावधान राखत संबंधित युवतीची कुत्र्याच्या तावडीतून सुटका केली. त्याचवेळी एका वृद्ध महिलेवरही त्या कुत्र्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, परिसरातील नागरिकांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते अजय उंडाळकर यांनी चार दिवसांपूर्वीच सोमवार पेठ परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढल्याची माहिती कराड पालिका प्रशासनाला दिली होती. तसेच, या कुत्र्यांमुळे एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त करत तातडीने उपाययोजना करण्याची मागणीही केली होती. मात्र, प्रशासनाने या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप उंडाळकर यांनी केला आहे.
कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या युवतीचे वडील अनिल कुलकर्णी यांनीही भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. 'आज माझ्या मुलीला कुत्र्याने चावा घेतला आहे. उद्या आणखी कोणालाही या भटक्या कुत्र्यांचा त्रास होऊ शकतो,' अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.

या घटनेमुळे सोमवार पेठ परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पालिका प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment