वेध माझा ऑनलाईन। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मधून बंड केल्यानंतर बारामती लोकसभेवर दावा केला आहे. त्यामुळे बारामतीत शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार उमेदवार देणार हे तर नक्की आहे. त्यादृष्टीने अजितदादा बारामतीत जाऊन बारामतीकराना भावनिक आवाहन सुद्धा करत आहेत. मात्र त्याच दरम्यान आता भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांनी अजितदादांना निवडणुकीपूर्वीच थेट इशारा दिला आहे. अजित पवारांनी ३ वेळा शब्द फिरवून आमच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यामुळे जे आमचे विधानसभेला काम करतील त्यांचेच आम्ही लोकसभेला काम करू असा इशारा अंकिता पाटील यांनी दिला आहे.
अंकिता पाटील म्हणाल्या, आम्ही यापूर्वी काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीत होतो आणि आता महायुतीत एकत्र आहोत. मागच्या तिन्ही वेळेस अजित पवार यांनी आम्हाला शब्द देऊन फिरवला आहे. त्यांनी आमची फसवणूक केली आहे. आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यामुळे जे आमचे विधानसभेला काम करतील त्यांचेच आम्ही लोकसभेला काम करू असा इशारा अंकिता पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात उलटसुलट चर्चा सुरु झाल्यात.
नेमका विषय काय?
खरं तर इंदापूरच्या विधानसभा जागेवरून अजित पवार पाटील यांच्यात वितुष्ट आलं होते. इंदापूर विधानसभा मतदारसंघ हा बारामती लोकसभेच्या अंतर्गत येतो. यापूर्वी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीमध्ये हर्षवर्धन पाटील आघाडीधर्म पाळून राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळेंना निवडणुकीसाठी मदत करायचे, मात्र लोकसभेनंतर विधानसभा निवडणुका येताच अजित पवार त्याठिकाणी त्यांचा उमेदवार उभा करत होते. २०१४ आणि २०१९ च्या दोन्ही विधानसभा निवडणुकीत अजितदादांनी दत्तात्रय भरणे याना विधानसभेचं तिकीट देऊन हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात उभे केलं होते. दोन्ही वेळा हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाला होता. आता अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील हे महायुतीत आहेत, त्यामुळे इंदापूर विधानसभेच्या जागेचा पेच पुन्हा उभा राहणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर अंकिता पाटील यांनी अजित पवार याना थेट इशारा दिला आहे.
No comments:
Post a Comment