वेध माझा ऑनलाइन। राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा सामाजिक कार्यकत्र्या अंजली दमानिया यांनी ‘एक्स’वर केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भुजबळ यांनी हा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंबंधीत प्रतिक्रिया देताना म्हटले की, आमच्या पक्षाचे निर्णय अंजली दमानिया करत नाहीत. अलीकडील काळात अंजली दमानिया या सुप्रिया सुळे यांच्या अधिक संपर्कात असतात. त्यामुळे त्यांनी असे ट्विट केले असेल. छगन भुजबळ त्यांच्या पक्षात आहेत, आम्ही आमच्या पक्षात आहोत.
तर छगन भुजबळ यांनी अंजली दमानिया यांचा दावा खोटा ठरवला असून ते म्हणाले की, अंजली दमानिया यांना ती माहिती कुठून मिळाली हे माहिती नाही. मात्र भाजपा प्रवेशाचा माझ्यासमोर कोणताही प्रस्ताव नाही. मी राष्ट्रवादी अजित पवार गटात अस्वस्थ असण्याचे कोणतेही कारण नाही. मी घेतलेल्या भूमिकेवर पक्षातील कोणीही टीका केली नाही. स्वत: अजित पवार यांनीही सांगितले की, भुजबळ त्यांच्या समाजाच्या वतीने भूमिका मांडत आहेत. त्यामुळे मी राष्ट्रवादीत का अस्वस्थ असेल? असे भुजबळ यांनी म्हटले आहे.
अंजली दमानियांनी काय म्हटले…
अंजली दमानिया यांनी ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे की, भुजबळ भाजपाच्या वाटेवर? एकेकाळी भुजबळांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जनहित याचिका करणारा भाजपा त्यांना मोठा ओबीसी नेता बनवणार? अशा भ्रष्ट माणसांना मोठे करणार, राजकारणासाठी? कुठे फेडाल हे पाप.
No comments:
Post a Comment