वेध माझाऑनलाईन। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले काका शरद पवार यांच्याशी फारकत घेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडल्यानंतर आता अजित पवारांनाही त्यांच्या सख्ख्या पुतण्याने जोरदार धक्का दिला आहे. अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे सुपुत्र युगेंद्र पवार हे शरद पवारांच्या गटात सामील झाले आहेत. तसेच बारामती लोकसभेसाठी ते सुप्रिया सुळेंचा प्रचार सुद्धा करतील. त्यामुळे शरद पवारांनी अजितदादांविरोधात खेळलेली ही मोठी खेळी म्हणावी लागेल.
महत्वाचे म्हणजे मागील आठवड्यात बारामती येथील जाहीर भाषणात अजित पवारांनी म्हंटल होत कि फक्त माझा परिवारच माझ्यासोबत आहे. बाकी संपूर्ण कुटुंब आज माझ्या विरोधात उभं आहे, त्यामुळे बारामतीकरांनो तुम्हीच मला साथ द्या…. अजितदादांचे ते विधान आता खरं ठरताना दिसत आहे. कारण श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार हे बारामतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या शहर कार्यालयाला आज सकाळी साडे दहा वाजता भेट देणार आहेत. शरद पवारांचे हात बळकट करण्यासाठी शहर कार्यालयाला उपस्थित राहण्याचे आवाहन युगेंद्र पवार यांनी केली आहे. युगेंद्र पवार हे शरद पवारांच्या ताफ्यात सामील झाल्याने अजित पवारांना हा मोठा धक्का मानला जातोय. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडताना स्वतःच्या कुटुंबीयांना सुद्धा विश्वासात न घेतल्याचे यामुळे स्पष्ट होत आहे.
कोण आहेत युगेंद्र पवार –
युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे सुपुत्र आहेत. ते सक्रीय राजकारणात नाहीत, युगेंद्र पवार हे विद्या प्रतिष्ठान संस्थेचे खजिनदार असून बारामती तालुका कुस्तीगीर संघाचेही ते काम पाहतात. व्यावसायिक जबाबदा-या ते सांभाळतात. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दीड महिन्यांपूर्वी कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष युगेंद्र पवार यांनी कुस्ती स्पर्धेचे आयोजन केलं होतं. त्यामुळे युगेंद्र पवार हे पहिल्यापासूनच शरद पवार यांच्यासोबत राहिल्याचे दिसून येते. आता तर युगेंद्र पवार थेट राजकरणात उतरण्याची शक्यता असून बारामतीत सुप्रिया सुळेंचा प्रचारही करतील.
No comments:
Post a Comment