Saturday, February 10, 2024

पुण्यात दिवसा ढवळ्या बंदुकीचा थरार ; आर्थिक वादातून पार्टनरला घातल्या गोळ्या ;

वेध माझा ऑनलाइन। पुण्यात कुख्यात गुंड शरद मोहोळच्या झालेल्या दिवसाढवळ्या हत्येनंतर सुरु झालेला बंदुकीचा थरकाप सुरुच आहे. कोथरूडनंतर आता पुण्यातील औंध भागात आर्थिक वादातून पार्टनरवर गोळीबार करून स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अनिल ढमाले अस आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे. आर्थिक वादातून हा गोळीबार करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. गोळीबारात जखमी झालेल्या आकाश जाधवची प्रकृती गंभीर आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

गोळीबार करण्यात आलेला पार्टनर आकाश जाधव या गोळीबारात गंभीर जखमी झाला आहे. औंधमधील ज्युपिटर चौकात हा प्रकार घडला. याच चौकात आकाश जाधवचे ज्वेलरी शॉप होते. हे शॉप त्याने अनिल ढमालेला चालवण्यासाठी दिले होते.  मात्र दोघांमधे गेल्या काही दिवसांपासून पैशाच्या व्यवहारावरुन वाद सुरु होते. 

आज (10 फेब्रुवारी) आकाशने अनिल ढमालेला दुकानात बोलावून घेतले. त्यानंतर दोघेही एकाच दुचाकीवरून बँकेत जाण्यासाठी निघाले. यावेळी दुचाकीच्या मागे बसलेल्या अनिल ढमालेनं दुचाकी चालवत असलेल्या आकाशवर मागून गोळी झाडली. गोळीबार केल्यानंतर त्याने पळ काढला. पळ काढल्यानंतर तो एका रिक्षात जाऊन बसला. रिक्षात बसल्यानंतर अनिलने रिक्षाचालकाला पुणे स्टेशनच्या दिशेने रिक्षा नेण्यास सांगितले. रिक्षातून थोडं अंतर गेल्यानंतर रिक्षाच्या मागील सीटवर बसलेल्या अनिल ढमालेनं स्वतःच्या सुद्धा डोक्यात गोळी मारुन आत्महत्या केली.

No comments:

Post a Comment