वेध माझा ऑनलाईन । भारतीय जनता पार्टीचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या मागणीची दखल घेत; राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी कराडमधील क्रीडाप्रेमींसाठी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम सर्वसोयींनीयुक्त व अत्याधुनिक स्वरुपात उभारण्याची घोषणा गेल्या महिन्यात केली होती. त्यानुसार स्टेडियमचा सुधारणा आराखडा तयार करण्यासाठी डॉ. अतुलबाबा भोसले पुढे सरसावले आहेत. त्यांनी आज कराड नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत छ. शिवाजी स्टेडियमची पाहणी करुन, खेळाडू व क्रीडाप्रेमींशी चर्चा केली. तसेच स्टेडियमच्या सुधारित आराखड्यासाठी लवकरच कराडमधील सर्व क्रीडाप्रेमींची व्यापक संयुक्त बैठक घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कराड येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर जानेवारी महिन्यात कृष्णा कृषी व औद्योगिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस प्रमुख उपस्थित होते. या सोहळ्यात डॉ. अतुलबाबा भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या विकासासाठी राज्य शासनाने विशेष लक्ष देण्याची मागणी ना. फडणवीस यांच्याकडे केली. त्यावेळी ना. फडणवीस यांनी आपल्या भाषणात डॉ. भोसले यांच्या मागणीची दखल घेत, या स्टेडियमचा लवकरच आराखडा तयार करुन, कराडकरांसाठी सुसज्ज व सर्वसोयींनीयुक्त असे अत्याधुनिक स्टेडियम उभारण्यासाठी राज्य सरकार विशेष प्रयत्न करेल, अशी ग्वाही दिली होती.
त्यानुसार भाजपाचे नेते डॉ. अतुलबाबा भोसले यांनी तातडीने स्टेडियमच्या अत्याधुनिकीकरणाकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून त्यांनी आज स्टेडियमला भेट देऊन येथील खेळाडू व क्रीडाप्रेमींशी चर्चा केली. यावेळी उपस्थित क्रीडाप्रेमींनी व क्रीडा प्रशिक्षकांनी स्टेडियम सुधारणेबाबतच्या आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या.
यावेळी बोलताना डॉ. भोसले म्हणाले, क्रीडाप्रेमींनी अनेक चांगल्या सूचना दिल्या आहेत. लवकरच स्टेडियमच्या सुधारित आराखड्यासाठी कराडमधील सर्व क्रीडाप्रेमींची व्यापक संयुक्त बैठक घेतली जाईल. येणाऱ्या ५० वर्षांत सर्व खेळांसाठी उपयुक्त असे सुसज्ज स्टेडियम उभारण्याचा माझा मानस आहे. राज्य सरकार यासाठी भरघोस निधी देण्याच्या मानसिकतेत असून, यासाठी कराडमधील क्रीडाप्रेमींची एक समितीही तयार केली जाणार आहे.
डॉ. अतुलबाबा भोसले यांचे कराड नगरपालिकेला भक्कम पाठबळ लाभत असून, त्यांच्या पुढाकारातून छ. शिवाजी महाराज स्टेडियमचा आराखडा साकारण्यात येत आहे. क्रीडाप्रेमींच्या सूचनांचा अंतर्भाव यामध्ये करण्यात येणार आहे. यासाठी सर्व क्रीडाप्रेमींची बैठक घेतली जाणार असून, त्याची तारीख लवकरच निश्चित करुन क्रीडाप्रेमींना कळविली जाईल, अशी माहिती नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी शंकर खंदारे यांनी दिली.
यावेळी नगरपालिकेचे उपअभियंता ए. आर. पवार, माजी नगरसेवक घन:श्याम पेंढारकर, उमेश शिंदे, मुकुंद चरेगावकर, रमेश मोहिते, नितीन वास्के, विनायक घेवदे, रमेश मोहिते, अभिषेक भोसले, किरण मुळे, प्रमोद शिंदे यांच्यासह खेळाडू, क्रीडाप्रेमी व क्रीडा प्रशिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment