Friday, February 2, 2024

भाजप आमदाराने केला शिवसेना नेत्यावर गोळीबार ; भाजप आमदाराला अटक ; खासदार श्रीकांत शिंदे यांनी शिवसेना नेत्त्याची रुग्णालयात जाऊन घेतली भेट ;

वेध माझा ऑनलाइन। उल्हासनगर येथील हिल लाईन पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्येच भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या प्रकरणी पोलिसांनी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना अटक केली आहे. जमिनीचा वाद आणि आपसांतील वैमनस्य यातून हा प्रकार घडल्याची घटना समोर आली आहे. महेश गायकवाड यांच्यावर ठाण्यातल्या ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. खासदार श्रीकांत शिंदे यांनी महेश गायकवाड यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली.

काय घडली घटना?
उल्हासनगर मधील हिल पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री भाजपचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेनेचे शिंदे गटाचे कल्याण पूर्व विभागाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यात बाचाबाची झाली. यावेळी आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड आणि त्यांच्या समर्थकांवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना अटक केली आहे.

उल्हासनगरमधल्या या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. महेश गायकवाड यांना आणि त्यांच्या एका समर्थकाला गोळ्या लागल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी माध्यमांना दिली. आमदार गायकवाड आणि शहरप्रमुख महेश गायकवाड शुक्रवारी रात्री हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल जगताप यांच्या दालनात बसले होते. त्यावेळी आमदार गायकवाड, शहरप्रमुख यांच्यात वादावादी झाली.यावरून संतप्त झालेल्या आमदारांनी महेश यांच्यावर गोळीबार केल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

No comments:

Post a Comment