Sunday, February 25, 2024

छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या विकास आराखड्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांना सादरीकरण ; डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केली भरघोस निधी देण्याची मागणी ;

वेध माझा आँनलाईन । कराडकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या विकास आराखड्याचे सादरीकरण सातारा येथे राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर करण्यात आले. शिवाजी स्टेडियमच्या अत्याधुनिकीकरणासाठी प्रयत्नशील असलेले भारतीय जनता पार्टीचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुलबाबा भोसले यांनी या आराखड्याचे सादरीकरण करत, राज्य शासनाकडून यासाठी भरघोस निधी उपलब्ध व्हावा, अशी मागणी ना. फडणवीस यांच्याकडे केली. यावेळी खा. उदयनराजे भोसले उपस्थित होते.

ना. फडणवीस हे विविध विकासकामांच्या उदघाटनासाठी सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. सातारा येथे ना. फडणवीस यांचे आगमन होताच, डॉ. अतुलबाबा भोसले यांनी स्वतः गाडीचे सारथ्य करत त्यांना खासदार उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर या निवासस्थानी नेले. तिथे ना. फडणवीस यांनी खा. भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस गेल्या महिन्यात कराड येथे आले असता; डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या मागणीला प्रतिसाद देत, त्यांनी कराडमधील क्रीडाप्रेमींसाठी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम सर्वसोयींनीयुक्त व अत्याधुनिक स्वरुपात उभारण्याची घोषणा केली होती. तसेच याबाबतचा विकास आराखडा सादर करण्याची सूचना केली होती. 

त्यानुसार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी तातडीने पावले उचलत स्टेडियमच्या विकास आराखड्याची आखणी सुरू केली. नुकतीच त्यांनी कराड नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत छ. शिवाजी स्टेडियमची पाहणी करुन, खेळाडू व क्रीडाप्रेमींशी चर्चा केली. तसेच त्यांच्या सूचना व अपेक्षा जाणून घेतल्या. या सूचनांचा अंतर्भाव असलेला स्टेडियमचा विकास आराखडा डॉ. भोसले यांनी सुप्रसिद्ध आर्किटेक्चर नितीश बेरी यांच्याकडून करून घेतला आहे. 


या विकास आराखड्याचे सादरीकरण डॉ. अतुलबाबा भोसले यांनी उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर केले. सर्व प्रकारच्या खेळांसाठी उपयुक्त सोयीसुविधा, तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांचा अंतर्भाव या विकास आराखड्यात करण्यात आला आहे. यासाठी भरघोस  विकास निधी देण्याची मागणीही डॉ. भोसले यांनी यावेळी उपमुख्यमंत्र्यांकडे केली. ना. फडणवीस यांनी याबाबत सकारात्मकता दर्शवित लवकरच याबाबत कार्यवाही करण्याची ग्वाही दिली. 

याप्रसंगी नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी शंकर खंदारे, आर्किटेक्चर नितीश बेरी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment