Saturday, February 10, 2024

राष्ट्रीय आरोग्य चित्रपट महोत्सवात कृष्णा विद्यापीठाच्या ‘फार्मासिस्ट’ लघुपटाची निवड

वेध माझा ऑनलाइन। पुणे येथे होणाऱ्या १२ व्या राष्ट्रीय आरोग्य चित्रपट महोत्सवात कृष्णा विश्व विद्यापीठातील फार्मसी अधिविभागाच्या ‘फार्मासिस्ट’ या लघुपटाची निवड झाली आहे. या लघुपटाचे दिग्दर्शन कृष्णा विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे संचालक डॉ. बाळकृष्ण दामले यांनी केले आहे.

आरोग्य जागृतीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या पुणे येथील पी. एम. शाह फाऊंडेशनच्यावतीने दरवर्षी आरोग्य समस्यांवरील चित्रपटांच्या राष्ट्रीय महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदाच्या १२ व्या राष्ट्रीय आरोग्य चित्रपट महोत्सवासाठी विविध भारतीय भाषांमधून अनेक विषयांवरचे हजारो लघुपट फाऊंडेशनकडे प्राप्त झाले होते. यामधून कृष्णा विश्व विद्यापीठातील फार्मसी अधिविभागाने तयार केलेल्या ‘फार्मासिस्ट’ या लघुपटाची निवड यंदाच्या महोत्सवासाठी करण्यात आली आहे.

कृष्णा विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे संचालक डॉ. बाळकृष्ण दामले यांनी दिग्दर्शित केलेल्या या लघुपटात फार्मसी अधिविभागातील प्रा. डॉ. विश्वजीत घोरपडे, प्रा. शिवशरण धडे, प्रा. ज्योत्स्ना गांधी व प्रा. जिशा यांनी भूमिका साकारल्या आहेत. त्यांना फार्मसी अधिविभागाचे अधिष्ठाता डॉ. नामदेव जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. पुणे येथील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात २३ व २४ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या १२ व्या राष्ट्रीय आरोग्य चित्रपट महोत्सवात या लघुपटाचे प्रदर्शन करण्यात येणार आहे.

या यशाबद्दल कृष्ण विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले, कुलपतींचे प्रधान सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा, प्र-कुलपती डॉ. प्रवीण शिणगारे, कुलगुरु डॉ. नीलम मिश्रा, कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे यांनी लघुपटाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आहे. 


No comments:

Post a Comment