Tuesday, May 13, 2025

भाजपच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी आ डॉ अतुल भोसले ; डॉ अतुलबाबा म्हणाले...सर्वांना बरोबर घेऊन जिल्ह्यात भाजपचे संघटन अधिक मजबूत करण्याचा माझा प्रयत्न राहणार ;

वेध माझा ऑनलाइन
 सातारा जिल्हा भाजपच्या अध्यक्षपदी कराड दक्षिणचे विद्यमान आमदार डॉ.अतुल भोसले यांची मंगळवारी निवड जाहीर करण्यात आली. प्रदेश निवडणूक अधिकारी आमदार चैनसुख संचेती यांनी ही निवड जाहीर केली. आमदार डॉ. अतुल भोसले यांनी यापूर्वी भाजप प्रदेश कार्यकारिणीवर सदस्य म्हणून काम पाहिले आहे. गत लोकसभा निवडणुकीच्या वेळी लोकसभा मतदारसंघाचे  प्रमुख म्हणून त्यांनी चांगले काम करून दाखवले होते.त्यांनी पंढरपूरच्या विठ्ठल रुक्माई मंदिर देवस्थान समितीचे अध्यक्षपदाची धुराही यशस्वीपणे सांभाळली होती. तर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी मोठ्या मताधिक्याने कराड दक्षिण मधून विजय संपादन केला आहे.या सर्व बाबींचा सकारात्मक विचार करूनच त्यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याचे मानले जात आहे.

खरंतर जिल्हाध्यक्ष पदाच्या स्पर्धेमध्ये मी कोठेही नव्हतो.मात्र पक्षाने माझ्यावर ही जबाबदारी दिली आहे. पक्षाने दिलेली कोणतीही जबाबदारी पार पाडणे माझे कर्तव्य आहे. त्यामुळे जिल्हाध्यक्ष म्हणून चांगले काम करण्याचा व सर्वांना बरोबर घेऊन जिल्ह्यात भाजपचे संघटन अधिक मजबूत करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. अशी प्रतिक्रिया डॉ.अतुल भोसले यांनी दिली आहे

दरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉ अतुलबाबांची झालेली निवड महत्त्वाची मानली जाते.

Sunday, May 11, 2025

युद्धबंदी जाहीर, तरी ऑपरेशन सिंदूर सुरूच राहणार ; कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं भारतीय वायुसेनेच आवाहन :

वेध माझा ऑनलाइन
भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर युद्धबंदी जाहीर करण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणावात अमेरिकेने मध्यस्थी केली. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानने काल (10 मे) सायंकाळी युद्धबंदी जाहीर केली. मात्र युद्धबंदीनंतरही भारताचं ऑपरेशन सिंदूर सुरुच राहणार असल्याचं भारतीय वायुसेनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
ऑपरेशन सिंदूर अजूनही संपलेलं नाही, अशी अधिकृत भूमिका भारतीय वायुसेनेकडून स्पष्ट करण्यात आली आहे. आतापर्यंत दिलेली जबाबदारी वायूदलानं चोखपणे बजावली आहे. तसेच कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन देखील भारतीय वायुसेनेने म्हटलं आहे.

नरेंद्र मोदी म्हणाले...पाकिस्तानमधून गोळ्या झाडल्या तर भारतातून तोफगोळे डागले जातील; अमेरिकेच्या मध्यस्तीनंतर नव्हे तर भारताने स्वतःच्या अटींवर शस्त्रसंधीची घोषणा केल्याची माहिती ;

वेध माझा ऑनलाइन।
पाकिस्तानमधून गोळ्या झाडल्या तर भारतातून तोफगोळे डागले जातील असा स्पष्ट संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दिला आहे. ऑपरेशन सिंदूर थांबणार नसून ते सुरुच असल्याचं भारताने स्पष्ट केलं. तसेच अमेरिकेच्या मध्यस्तीनंतर नव्हे तर भारताने स्वतःच्या अटींवर शस्त्रसंधीची घोषणा केल्याची माहिती आहे. 
ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने पाकिस्तानवर अशा जखमा केल्या आहेत ज्या भरून येण्यास बराच वेळ लागेल. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, भारतीय सैन्याने 100 हून अधिक दहशतवाद्यांना नरकात पाठवले आणि 9 दहशतवादी तळ आणि पाकिस्तानचे लष्करी पायाभूत सुविधा नष्ट केल्या.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने जगभरातील मित्र राष्ट्रांशी चर्चा केली होती. या संभाषणात ऑपरेशन सिंदूरबद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नसली तरी, भारताने ज्या देशांशी चर्चा केली त्या सर्व देशांना स्पष्टपणे सांगण्यात आले की यावेळी कठोर कारवाई केली जाईल. या प्रकरणात भारताची भूमिका अगदी स्पष्ट होती.

100 वर्षे कुठल्याही वातावरणात हा पुतळा टिकेल,: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वेध माझा ऑनलाइन।
मालवण किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली होती. त्यानंतर, राज्यभरातून शिवभक्तांनी संताप व्यक्त केला. संतापाची लाट पाहून सरकारने लवकरच पहिल्यापेक्षा उत्तम आणि दिमाखदार पुतळा उभारण्यात येईल, असे म्हटले होते. त्यानुसार, आज सिंधुदुर्गातील मालवण किल्ल्यावर छत्रपतींचा नवा पुतळा दिमाखात उभा राहिला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाममंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुतळ्याचे अनावरण झाले. सुतार साहेबांनी उत्तम पुतळा तयार केलाय. जर वादळं आली, त्या इन्टेन्सिटीचा अभ्यास करत हा पुतळा उभा करण्यात आला आहे. किमान 100 वर्षे कुठल्याही वातावरणात हा पुतळा टिकेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुतळा अनावरण सोहळ्यानंतर बोलताना दिली.

100 हून जास्त दहशतवाद्यांचा खात्मा / 35 ते 40 पाकिस्तानी सैनिकांसह अनेक अधिकारीही मारले गेले;

वेध माझा ऑनलाइन।
पहलगाम हल्ल्याचा बदला भारतीय लष्कराने घेतला असून मुरिदके, भावलपूरसह नऊ ठिकाणी हल्ले करुन 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांना मारल्याची माहिती डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी दिली. पाकिस्तानच्या दहशतवादाला उद्ध्वस्त करणे हेच ऑपरेशन सिंदूरचे ध्येय असल्याचंही ते म्हणाले. भारतीय सेनेच्या कारवाईत 35 ते 40 पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा झाला असून त्यामध्ये अनेक अधिकाऱ्यांचाही समावेश आहे अशी माहिती देण्यात आली. ऑपरेशन सिंदूरमध्ये करण्यात आलेल्या कारवाईची माहिती देण्यासाठी लष्कराच्या तीनही दलांनी एक पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ही माहिती देण्यात आली.

" ब्रह्मस्त्र ' न केलीे दहशतवादी तळांची राखरांगोळी ; पाकिस्तानला भारताचा स्पष्ट इशारा

वेध माझा ऑनलाइन
 भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आणि ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, भारताने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये घुसून 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. यामध्ये बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय देखील समाविष्ट होते. ते नष्ट करण्यासाठी भारताने त्याचे सर्वात शक्तिशाली शस्त्र वापरले.
वृत्तसंस्था एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयने जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेला भारताविरोधात बळ दिलं. त्यामुळेच भारताला त्यावर कडक उपाययोजना करत त्याच्या सर्वात शक्तिशाली शस्त्राचा वापर करावा लागला. पण हे सर्वात शक्तिशाली अस्त्र कोणतं हे मात्र स्पष्ट झालेलं नाही. संरक्षण मंत्री राजनाथ यांनी रविवारी संवाद साधताना काही संकेत दिले. ते म्हणाले की, "भारताने पाकिस्तानवर हल्ला करण्यासाठी ब्राह्मोसचा वापर केला. ब्राह्मोसचा आवाज रावळपिंडीपर्यंत ऐकू येत होता."

Thursday, May 8, 2025

दहशतवाद खपऊन घेणार नाही : सुधरा नाहीतर संपवून टाकू ; भारताचा पाकिस्तानला इशारा ;

वेध माझा ऑनलाइन
भारत हल्ला करत असल्याचा पाकिस्तानचा दावा चुकीचा असून भारत दहशतवादी कारवायांना प्रत्युत्तर देत असल्याचं भारतीय परराष्ट्र खात्याने स्पष्ट केलं. यापुढे पाकिस्तानचा दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही, त्याला जशास तसं उत्तर दिलं जाईल असंही स्पष्ट करण्यात आलं.गेल्या 65 वर्षांमध्ये सिंधू कराराचं पालन करणे ही भारताची सहनशिलता आहे. यापुढे भारत आपल्या हक्काचे पाणी वापरणार असंही या पत्रकार परिषदेतून स्पष्ट करण्यात आलं. 
पाकिस्तानने भारतावर केलेल्या हल्ल्याला भारताने चोख उत्तर देत लाहोरसह अनेक ठिकाणच्या एअर डिफेन्स सिस्टिम निष्क्रिय केल्याची माहिती भारतीय लष्कराने दिली. पाकिस्तानने भारतातील 15 शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण भारताने तो हल्ला उधळून लावला आणि प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानच्या रडार यंत्रणा निष्क्रिय करुन दिला असल्याची माहिती देण्यात आली. भारताच्या या कारवाईची माहिती कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह आणि परराष्ट्र खात्याचे अधिकाऱ्यांनी दिली

पाकिस्तानचा लष्करप्रमुख असीम मुनीर ताब्यात ; असीम मुनीर याच्यावर देशद्रोहाचा खटला चालवला जाणार असल्याची माहिती ;

वेध माझा ऑनलाइन
भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्यानंतर तो देश अनागोंदीच्या दिशेने चालला असल्याचं चित्र आहे. पाकिस्तानचा लष्करप्रमुख असीम मुनीरला ताब्यात घेण्यात आलं असून त्याची उचलबांगडी केली जाणार आहे. असीम मुनीर याच्या हेकेखोरीमुळे पाकिस्तानवर युद्धाची वेळ आली असल्याचं मत तिथल्या नागरिकांचे आणि सत्ताधाऱ्यांचं झाल्याची माहिती आहे. त्याचमुळे असीम मुनीर याच्यावर देशद्रोहाचा खटलाही चालवला जाणार असल्याची माहिती आहे. पाकिस्ताच्या लष्करप्रमुखपदी आता शमशाद मिर्झा यांची नियुक्ती होण्याची चर्चा आहे. असीम मुनीर हा पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड असल्याची भावना भारताची आहे. त्याच्या चिथावणीनंतरच दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर हल्ला केला होता. दहशतवाद्यांना चिथवायचं आणि नंतर भारताने प्रतिक्रिया दिल्यावर भारतावर हल्ला करायचा असा असीम मुनीर याचा डाव होता. पाकिस्तानी जनतेची आणि राज्यकर्त्यांची इच्छा नसतानाही असीम मुनीरच्या खुमखुमीमुळे पाकिस्तानवर युद्धाची वेळ आली असल्याची समज सर्वत्र आहे. आधीच पाकिस्तानची परिस्थिती ही डबघाईला आली होती. त्यात भारतासोबत कुरापत काढून असीम मुनीरने ही परिस्थिती आणल्याची भावना तिथल्या लोकांची आहे. 

पाकिस्तानचा ड्रोन हल्ला ; जम्मूत ब्लॅक आऊट ; भारताने पाकिस्तानचे सर्व ड्रोन पाडले;

वेध माझा ऑनलाइन।
ऑपरेशन सिंदूरमुळे बिथरलेल्या पाकिस्तानने आगळीक केली असून त्याने भारतावर ड्रोन हल्ले केले. जम्मू, पठाणकोट, जैसलमेर, पंजाबमधील होशियारपूरवर पाकिस्तानने ड्रोन हल्ला केला.  पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर या ठिकाणी ब्लॅकआऊट करण्यात आलं असून भारताची डिफेन्स सिस्टिम सक्रिय झाली आहे.  

भारताने पाकिस्तानचे सर्व ड्रोन पाडल्याची माहिती समोर आली आहे. जम्मूतील विमानतळ हे पाकिस्तानचे लक्ष्य होतं अशी माहिती समोर येत आहे. पाकिस्तानच्या या हल्ल्याला भारताने लागोलाग उत्तर दिलं असून थेट इस्लामाबाद आणि लाहोरवर क्षेपणास्त्रांचा हल्ला केला आहे

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या घरापासून 20 किलोमीटर अंतरावर स्फोट ; पाकिस्तानचे पंतप्रधान बंकर मध्ये लपले..

वेध माझा ऑनलाइन
भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. पाकिस्तानकडून होणाऱ्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांना भारतीय लष्कराकडून योग्य उत्तर दिलं जात आहे. मिडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या घरापासून 20 किलोमीटर अंतरावर स्फोट झाल्याचं वृत्त समोर आलं आहे.त्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान घाबरुन बंकरमध्ये लपल्याची माहिती मिळत आहे.

भारताने केला इस्लामाबाद आणि लाहोरवर क्षेपणास्त्र हल्ला ; पाकिस्तान बिथरला -

वेध माझा ऑनलाइन
ऑपरेशन सिंदूरमुळे बिथरलेल्या पाकिस्तानने आगळीक केली असून त्याने भारतावर ड्रोन हल्ले केले. जम्मू, पठाणकोट, जैसलमेर, पंजाबमधील होशियारपूरवर पाकिस्तानने ड्रोन हल्ला केला.  पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर या ठिकाणी ब्लॅकआऊट करण्यात आलं असून भारताची डिफेन्स सिस्टिम सक्रिय झाली आहे.  भारताने पाकिस्तानचे सर्व ड्रोन पाडल्याची माहिती समोर आली आहे. जम्मूतील विमानतळ हे पाकिस्तानचे लक्ष्य होतं अशी माहिती समोर येत आहे. पाकिस्तानच्या या हल्ल्याला भारताने लागोलाग उत्तर दिलं असून थेट इस्लामाबाद आणि लाहोरवर क्षेपणास्त्रांचा हल्ला केला आहे. 


अजित पवारांना मुख्यमंत्री म्हणून संधी मिळाली तर त्याचं स्वागतच करेल ; रोहित पवार असं का म्हणाले?

वेध माझा ऑनलाइन
मलाही मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण योग जुळून येत नाही, अशी खंत उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनी पुन्हा एकदा व्यक्त केली. ‘गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव 2025’च्या उद्घाटनाप्रसंगी त्यांनी हे वक्तव्य केले होते. अजित पवारांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार आणि अजित पवारांचे पुतणे रोहित पवार यांनी याबाबत मोठं वक्तव्य केलंय. जर या सरकारमध्ये त्यांना मुख्यमंत्री म्हणून संधी मिळाली तर पुतण्या म्हणून मी त्याचं स्वागतच करेल, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. 
ते म्हणाले...  ते अनेक वर्ष उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्या पदाच्या वर मुख्यमंत्रीपदच राहते. सहाजिकच तुम्ही इतके वर्ष दोन नंबरच्या पदावर राहिला असाल तर तुमची इच्छा मुख्यमंत्रीपदाची व्हावी. 
या सरकारच्या माध्यमातून अजितदादा यांना संधी दिली जात असेल तर त्यांना आवडेलच. तसेच कुटुंबाला आणि कार्यकर्त्यांना देखील आवडेल. मी त्यांचा पुतण्या म्हणून मला सुद्धा ती गोष्ट आवडेल. ते आता वेगळ्या सरकारमध्ये आहेत.  पण अजित पवारांना मुख्यमंत्री पद मिळत असेल तर त्या गोष्टीचं मी नक्कीच स्वागत करेल. आनंद देखील व्यक्त करेल, असे रोहित पवारांनी म्हटले आहे.

पाकिस्तान लाहोरमधील अमेरिकन नागरिकांना हाय अलर्ट, पाकिस्तान सोडण्याच्या सूचना

वेध माझा ऑनलाइन
पाकिस्तानच्या आगळीकतेनंतर भारताने लाहोरमधील रडार यंत्रणा उद्ध्वस्त करुन त्या देशाला इशारा दिला आहे. त्यामुळे पाकिस्तामध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊन देशभर सायरनचा वाजवण्यास सुरुवात झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर अमेरिकेने त्यांच्या नागरिकांना आणि दूतावासातील कर्मचाऱ्यांना हाय अलर्टचे निर्देश दिले आहेत. भारत आणि पाकिस्तानच्या सीमाभागात जाऊ नका, लाहोरमध्ये लपण्यासाठी सुरक्षित आश्रय शोधा, तसेच देश सोडण्यासाठी सर्व कागदपत्रं तयार ठेवा असे आदेश अमेरिकेने दिले आहेत. पाकिस्तानमधील पंजाबच्या लाहोरमधील अमेरिकन नागरिकांसाठी अलर्ट जारी केला आहे. अमेरिकेच्या लाहोरस्थित वाणिज्यदूतावासातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना सुरक्षित स्थळी आश्रय घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अमेरिकेने त्यांच्या पाकिस्तानमधील नागरिकांना दिलेल्या या सूचनांनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध अटळ असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान अमेरिकेच्या कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी लाहोरमध्ये कुठेही फिरू नयेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत. लाहोरच्या विमानतळाच्या आजूबाजूचा परिसर हा रिकामा केला जाऊ शकतो असंही अमेरिकेने सांगितलं आहे. पाकिस्तानमधून बाहेर पडण्यासाठी प्लॅन तयार करा, सर्व आवश्यक कागदपत्रं तयार ठेवा असंही अमेरिकेने सांगितलं आहे. कुणाच्याही मदतीच्या भरवशावर थांबू नका. स्थानिक माध्यमांतील बातम्यांवर लक्ष ठेवा असंही सांगण्यात आलं आहे.

पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचे जवान दिनेश कुमार शहीद, 15 नागरिकांचाही मृत्यू झाल्याची माहिती आली समोर ;

वेध माझा ऑनलाइन
भारतीय सैन्याने मंगळवारी रात्री पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला. या मोहीमेला ऑपरेशन सिंदूर  असे नाव देण्यात आले होते. या ऑपरेशनतंर्गत पीओकेमधील 9 ठिकाणी क्षेपणास्त्रांचा मारा करुन दहशतवादी तळ बेचिराख करण्यात आले. अवघ्या 25 मिनिटांत भारतीय वायूदलाने ही सगळी कामगिरी पार पाडत पाकिस्तानी सैन्याला चपराक लगावली. भारताची क्षेपणास्त्रे पाकिस्तानच्या रडारला पत्ता लागून न देता अचूक जाऊन लक्ष्यावर आदळली. भारतीय वायूदलाच्या या हल्ल्यामुळे पाकिस्तानी लष्कर प्रचंड धास्तावले होते. त्यामुळे पाकिस्तानमधील प्रमुख शहरांमध्ये बुधवारी रात्री ब्लॅकआऊट  करण्यात आला होता
दरम्यान पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचे जवान दिनेश कुमार शहीद, 15 नागरिकांचाही मृत्यू झाल्याची माहिती आहे

"ऑपरेशन सिंदूर' ; सानिया मिर्झाने केली खास पोस्ट ;

वेध माझा ऑनलाईन
भारताची माजी टेनिसपटू सानिया मिर्झा हिने 'ऑपरेशन सिंदूर' संदर्भातील दोन महिला अधिकाऱ्यांच्या सहभागाबद्दल सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. ऑपरेशन सिंदूरबाबत  सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांच्यासमवेत 'ऑपरेशन सिंदूर' विषयी माहिती दिली होती. सानिया मिर्झा  हिने दोन महिला अधिकाऱ्यांचा पत्रकार परिषद घेतानाचा फोटो शेअर केलाय. सानिया मिर्झा  हिने या पोस्टला शेअर करून महिला अधिकाऱ्यांच्या योगदानाचे समर्थन केले. सानिया म्हणाली, हा फोटो परफेक्ट आहे, आपण देश म्हणून काय आहोत हे दाखवणारा आहे..

मसूद अजहरचा दहशतवादी भाऊ रौफ असगरचा खात्मा

वेध माझा ऑनलाइन।
भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानातील बहवालपूरमधील दहशतवादी मसूद अझहरच्या जैश-ए- मोहम्मदचं मुख्यालय मरकज सुबहान अल्लाहवर हल्ला करत मसूद अझहरचं कंबरडं मोडलं. यात मसूद बचावला असला तरी त्याच्या कुटुंबातल्या 14 जणांचा खात्मा झाला. भारतीय लष्कराने पाकिस्तानस्थित दहशतवादी नेता मसूद अझहरच्या लपण्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विनाश केला.  भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या आत 100 किमी अंतरावर असलेल्या बहावलपूरमधील जैश ए मोहम्मदच्या मुख्यालयावर आणि इतर 8 तळांवर हल्ला केला. दरम्यान, कुख्यात दहशतवादी मसूद अझहरच्या घरी मृतदेहाची रांग लागली आहे. पाकिस्तानातून बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मदचा तळ उद्ध्वस्त झाल्यानंतर बहावलपूरमधून फोटो आले आहेत.

पाकिस्तानची HQ-9 रडार यंत्रणा उद्ध्वस्त ; भारतीय लष्कराची माहिती ;

वेध माझा ऑनलाइन।
पाकिस्तानी सैन्याने भारतातील अनेक शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानने पंजाब, गुजरात आणि राजस्थानमधील भारतीय लष्कराच्या तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे भारतीय वायूदलाने ड्रोनचा वापर करुन लाहोरमधील पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम आणि रडार यंत्रणा उद्ध्वस्त केल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तान भारतावर मोठा हल्ला करण्याच्या प्रयत्नात होता. हा हल्ला उधळून लावण्यासाठी भारताने ड्रोन हल्ला करुन पाकिस्तानची HQ-9 रडार यंत्रणा उद्ध्वस्त केली, अशी माहिती भारतीय लष्कराकडून देण्यात आली.

भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर चवताळलेल्या पाकिस्तानने 7 आणि 8 मे2025 च्या रात्री अमृतसर, अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, जालंधर, भुज, आदमपूर, भटिंडा, लुधियाना भारतीय लष्कराच्या तळावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, भारतीय सैन्याने पाकिस्तानचा हा प्रयत्न हाणून पाडला. दरम्यान, HQ-9 ही चायना प्रेसिजन मशिनरी इम्पोर्ट-एक्सपोर्ट कॉर्पोरेशनन विकसित केलेली एक पृष्ठभागावरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली आहे. ही क्षेपणास्त्र प्रणाली चीनच्या लष्करी तंत्रज्ञानाचं एक उत्तम उदाहरण मानली जाते आणि 2021 मध्ये पाकिस्ताननं आपल्या ताफ्यात तिचा समावेश केलेला.

भारतीय लष्कराने दिलेली माहिती पुढीलप्रमाणे...
ऑपरेशन सिंदूर संदर्भात 7 मे 2025 रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत भारताने आपल्या कारवाईला केवळ लक्ष्य केंद्रीत मोजकी आणि तणाव न वाढवणारी अशी भूमिका असल्याचे स्पष्ट केले होते. पाकिस्तानातील लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलेले नाही, हेही ठामपणे सांगण्यात आले होते. भारतातील लष्करी ठिकाणांवर कोणताही हल्ला झाल्यास त्याला योग्य प्रत्युत्तर दिले जाईल, हेही पुन्हा अधोरेखित करण्यात आले.

पाकिस्तानमधील मोठमोठी शहरं ड्रोन हल्ल्यानं हादरली ;

वेध माझा ऑनलाइन।
भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानमधील मोठमोठी शहरं ड्रोन हल्ल्यानं हादरल्याची पाहायला मिळत आहे. भारताने पाकिस्तानमधील 9 शहरांत ड्रोन हल्ले केल्याचा पाकिस्तानने दावा केला आहे. लाहोर, रावळपिंडी, कराचीमध्ये भारताकडून ड्रोन हल्ले करण्यात आले असा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला आहे. 

लाहोरमधल्या लष्करी तळावर भारतानं हल्ला केल्याचंही पाकिस्तानने म्हटलं आहे. 
भारताने पाकिस्तानमधील 9 शहरांत ड्रोन हल्ले केले आहे. लाहोर, रावळपिंडी,कराची या शहारांत भारताकडून ड्रोन हल्ले करण्यात आले आहे. लाहोरमधल्या लष्करी तळावर भारतानं हल्ला केल्याचा पाकिस्तानने दावा केलाय. गुजरानवाला आणि अटक शहरांवरही भारताकडून ड्रोन हल्ले झाल्याचा दावा पाकिस्तानच्या आयएसपीआरचे महासंचालक ले.जन.अहमद शरीफ यांनी केला आहे. भारताचे 12 ड्रोन पाडल्याचा दावाही पाकिस्तानने केला आहे.

Wednesday, May 7, 2025

पालिका - महापालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा, जाणून घ्या... ओबीसी आरक्षणावरील सुनावणी संदर्भातील माहिती...

वेध माझा ऑनलाइन
कोरोना काळापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींना लवकरच मुहूर्त लागणार आहे. सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला येत्या चार महिन्यात रखडलेल्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत. तसंच चार आठवड्यांमध्ये निवडणुकीबाबत अधिसूचनाही काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे चार महिन्यात निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे 2022 मधील ओबीसी राजकीय आरक्षणासह या निवडणुका पार पडणार आहेत. सध्या विविध स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासकीय कारभार सुरू आहे.
 
 दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण किती असावं हे नव्याने निश्चित करण्यात यावं या मागणीसाठी विकास गवळी यांच्याकडून 2018 मध्ये नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली. 2019 मध्ये ही याचिका सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली.

महाराष्ट्रात ओबीसींचे प्रमाण सध्या लागू असलेल्या 27 टक्के आरक्षणापेक्षा अधिक असल्याने हे आरक्षण वाढवून मिळावे अशी या याचिकेत मागणी होती.

नंदुरबार, गडचिरोली आणि पालघर या तीन आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये ST , SC आणि OBC आरक्षण मिळून पन्नास टक्क्यांच्या पुढे जात होते हे देखील यामध्ये नमूद करण्यात आले होते. 

सर्वोच्च न्यायालयाने याबाबत राज्य सरकारला माहिती देण्याचे आदेश दिल्यावर राज्य सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाने गोळा केलेला डेटा सर्वोच्च न्यायालयात सादर केला. 

 मात्र हा डेटा फेटाळताना 4 मार्च 2021 ला सर्वोच्च न्यायालयाने OBC आरक्षणासाठी स्वतंत्र समर्पित आयोग नेमण्याचे आदेश दिले. 

 11 मार्च 2022 ला उद्धव ठाकरे सरकारने माजी सचिव जयंतकुमार बांठिया यांच्या नेतृत्वाखाली बांठिया आयोगाची स्थापना केली. 

 मात्र 2022 च्या जून महिन्यात उद्धव ठाकरे यांचं सरकार पडलं आणि 30 जूनला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले.

 बांठिया आयोगाच्या शिफारशी 12 जुलैला सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारल्या. 

 मात्र बांठिया आयोगाच्या शिफारशींमुळे ओबीसींच्या जागा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कमी होत होत्या. त्यामुळे अनेक संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. यामुळे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संथांच्या निवडणुका रखडल्या.

राज्यातील 34 जिल्हा परिषदा, 29 महापालिका , 22 नगरपालिका, 41 नगरपरिषदा आणि 289 पंचायत समितीच्या निवडणुका यामुळे रखडल्या . 

 तीन वर्षे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संथांमध्ये प्रशासक राज राहिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा 2022 च्या आधी ज्या पद्धतीने निवडणुका घेतल्या जात होत्या. त्याच पद्धतीने म्हणजे ओबीसीच्या 27 टक्के आरक्षणासह निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत.  या सर्वातून काहीच साध्य झालेले नाही. ना OBC आरक्षण वाढले ना OBC आरक्षण कमी झाले

तर पाकिस्तान पाऊल उचलणार नाही ; पाकिस्तान घाबरला!

वेध माझा ऑनलाईन।
भारतीय लष्कराकडून 15 दिवसात जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यात आला. अवघ्या 23 मिनिटांत भारतीय सैन्यदलांकडून ऑपेरशन सिंदूर फत्ते करण्यात आले. पाकव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त करण्यात आले. ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्कर ए तोयबाच्या 2 टॉप कमांडर्सचा खात्मा करण्यात आला आहे. मुरिदकेच्या मरकझ तय्यबा मशिदीवरील हल्ल्यात अब्दुल मलिक आणि मुदस्सीर ठार झाल्याची माहिती मिळत आहे. फ्रान्सकडून घेतलेल्या राफेल विमानांनी ऑपरेशन सिंदूरद्वारे जबरदस्त कामगिरी केली. स्काल्प क्षेपणास्त्रांचा अचूक मारा करत दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले.

भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान चांगलाच घाबरल्याचे दिसून आले. भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानच्या संरक्षण मंत्री ख्वाजा मुहम्मद आसिफ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. भारतानं कारवाई थांबवली तर पाकिस्तान देखील पाऊल उचलणार नाही, असं पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मुहम्मद आसिफ म्हणाले. 
भारताच्या या कारवाईवर पाकिस्तानच्या पंतप्रधानांची शहबाझ शरीफ यांनी पहिली प्रतिक्रिया आली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाझ शरीफ यांनी भारतानं काही ठिकाणांवर हल्ले केले आहेत. भारताकडून करण्यात आलेल्या युद्धासारख्या कृतीचं जोरदार उत्तर देण्याचा पाकिस्तानला पूर्ण अधिकार आहे. जोरदार उत्तर दिलं जाईल.  संपूर्ण पाकिस्तानी देश सशस्त्र दलांसोबत उभा आहे. पाकिस्तान देशाचं मनोबल उच्च आणि भावना देखील जोरात आहेत. पाकिस्तानी राष्ट्र आणि पाकिस्तानी लष्कर चांगल्या प्रकारे जाणते की दुश्मनांचा सामना कशा प्रकारे करावा. दुश्मन त्यांच्या इराद्यामध्ये यशस्वी होणार नाहीत, अशी प्रतिक्रिया शहबाझ शरीफ यांनी दिली.

Tuesday, May 6, 2025

रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यांत घेण्याचे निर्देश ;

वेध माझा ऑनलाइन।
राज्यात गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं जारी केलेत. येत्या चार आठवड्यांत याबाबतची अधिसूचना जारी करत पुढील चार महिन्यांत या निवडणूका घेण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाला देण्यात आले आहेत. त्यामुळं राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर यासह रखडलेल्या महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकींचा मार्ग मोकळा झाला आहे.राज्यात गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. यासंदर्भात येत्या चार आठवड्यांत अधिसूचना जारी करत पुढील चार महिन्यांत या निवडणूका घेण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाला देण्यात आले आहेत. दरम्यान, राज्यातील ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर या निवडणुकांचं घोंगडं इतकी वर्ष प्रलंबित होतं. मात्र, यंदाच्या निवडणुका साल २०२२ मध्ये सादर झालेल्या बांठिया कमिशनच्या रिपोर्ट आधी अस्तित्वात असलेल्या ओबीसी आरक्षणानुसारच घेण्याचे निर्देश देखिल सर्वोच्च न्यायालयाकडून जारी करण्यात आले आहेत. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन.के. सिंह यांच्या खंडपीठानं राज्य निवडणूक आयोगाला स्पष्ट निर्देश दिलेत की, येत्या महिन्याभरात निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होणं आवश्यक आहे. जेणेकरून पुढील चार महिन्यांत राज्यातील सर्व प्रलंबित स्थानिक स्वराज्य निवडणुका घेता येतील. ओबीसी आरक्षणाशी संबंधित कुठल्याही याचिकेचा या निवडणुकांवर परिणाम होणार नाही. कारण येणारे निकाल हे न्यायालयाच्या अंतिम निकालावर अवलंबून असतील. आरक्षणाच्या मुद्द्यावर इतकी वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न घेणं हे योग्य नाही. भारतीय संविधानानं नागरीकांना दिलेल्या मुलभूत अधिकारांचं रक्षण होणंही तितकंच गरजेचं आहे, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे.

कराडच्या यशवंत सहकारी बँकेच्या १४० कोटीपैकी १२७ कोटींचे कर्ज तत्कालीन अध्यक्ष शेखर चरेगवाकर व त्यांचा कुटूबियांच्या नावे ; चरेगाकरांनी काही बोगस कम्पन्या स्थापन केल्या ; अॅड. निलेश जाधव यांची पत्रकार परिषदेत माहिती ;

वेध माझा ऑनलाइन।
कराडच्या यशवन्त बँकेच्या घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे. त्यात अन्य बँकाही अडकल्या आहेत.  त्यांच्या नावाने ती कर्जे वितरीत केली आहेत.असे असतानाही बँकेचे संचालक व कर्मचारी जबरदस्तीने कर्ज वसुलीसाठी दबाव तंत्राचा वापर करीत आहेत. त्यामुळे या सगळ्याचा विचार करून शासनाने सीबीआय व आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागातर्फे योग्य चौकशी व्हायला हवी. त्यासाठी ठेवीदार व सभासद व फसलेले कर्जदार प्रयत्न करत आहेत. मात्र त्याचा फारसा प्रभाव पडताना दिसत नाही अशी माहिती ठेवीदार संघटनेचे अॅड. निलेश जाधव, एस. डी. कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

दरम्यान यशवंत सहकारी बँकेच्या १४० कोटीपैकी १२७ कोटींचे कर्ज बँकेचे तत्कालीन अध्यक्ष शेखर चरेगवाकर व त्यांचा कुटूबियांसह त्यांनी स्थापन केलेल्या बनावट संस्थांच्या नावावर आहेत. त्या संबधितांच्या नावावर व्यवहार झाल्याचे ऑडीट रिपोर्टही आहेत असेही एडव्होकेट जाधव म्हणाले  

यशवंत बँकेच्या विरोधात ठेवीदार, कर्जदार न्यायालयासहीत पोलिस व अन्य पातळ्यांवर लढा देत आहेत. त्याची माहिती देण्यासाठी अॅड. जाधव यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी फसवणुक झालेले ठेवीदाार, कर्जदारही उपस्थित होते. 

अॅड. निलेश जाधव म्हणाले, सुमारे दिड वर्षापासून सातत्याने यशवंत बँकेचे सभासद, ठेवीदार व कर्जदार बँकेतील घोटाळ्याबाबत पाठपुरावा करीत आहोत. त्या अनुषंगाने केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री शाह यांची राज्यसभेच्या खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या पुढाकाराने दोन दिवसापूर्वी भेट झाली. त्यांच्याशी बैठक झालेल्या बैठकीत खासदार डॉ. कुलकर्णी, मी स्वतः व बँकेचे सभासद संजीव कुलकर्णी उपस्थित होतो. यावेळी गृहमंत्री शाह यांच्याबरोबर बँकेत झालेल्या प्रकाराबाबत सविस्तर चर्चा केली. त्यावेळी त्यांनी त्याची गांभीर्याने दखल घेतली आहे. 

यशवंत सहकारी बँकेच्या १४० कोटीपैकी १२७ कोटींचे कर्ज बँकेचे तत्कालीन अध्यक्ष शेखर चरेगवाकर व त्यांचा कुटूबियांसह त्यांनी स्थापन केलेल्या बनावट संस्थांच्या नावावर आहेत. त्या संबधितांच्या नावावर व्यवहार झाल्याचे ऑडीट रिपोर्टही आहेत. त्यामुळे बँकेत आर्थिक घोटाळा झाला आहे, त्याची सीबीआयतर्फे चौकशी करावी, अशी मागणी केंद्रीय सहकारी मंत्री अमित शाह यांना भेटून केली आहे. यासाठी राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांचे महत्वाचे सहकार्य मिळाले आहे, गृहमंत्री शाह यांनीही दोन महिन्यात सिबीआयतर्फे त्या सगळ्याची चौकशी करू, असे अश्वासन दिले आहे, अशीही माहिती ठेवीदार संघटनेचे अॅड. निलेश जाधव, एस. डी. कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

Saturday, May 3, 2025

औषध देण्याच्या बहाण्याने तीन दिवसांचे बाळ पळवले ; मिरजेच्या शासकीय रुग्णालयात खळबळ ;

वेध माझा ऑनलाइन।
मिरजेच्या शासकीय रुग्णालयात तीन दिवसाच्या नवजात बाळाला अज्ञात महिलेनं पळवून नेल्याची धक्कादायक घटना शनिवारी उघडकीस आली. दोन दिवस प्रसूती विभागात फिरुन रुग्णांचा विश्वास संपादन केला आणि त्यानंतर आरोपी महिलेने बाळाला पळवल्याचं स्पष्ट झालं. रुग्णालयाच्या सीसीटीव्हीमध्ये ही महिला कैद झाली असून पोलिस तपास करत आहेत. मात्र या प्रकारवरुन रुग्णालय प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

दोन दिवस रुग्णालयात मुक्तपणे फिरत होती
कविता समाधान अलदर (कोळे, ता.सांगोला, जि. सोलापूर) या महिलेला प्रसूतीनंतर मुलगा झाला होता. शनिवारी सकाळी 11 वाजता औषध देण्याच्या बहाण्याने एक अनोळखी महिला बाळ घेऊन पसार झाली. दोन दिवसांपासून ती महिला प्रसूती विभागात फिरत होती आणि नातेवाईकांचा विश्वास संपादन करत होती.  

सदरची महिला रुग्णालयात जाताना सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलिस तिचा शोध घेत आहेत. ती महिला दोन दिवस रुग्णालयात मुक्तपणे फिरत होती अशी माहिती समोर येत आहे. यामुळे या घटनेने रुग्णालयात खळबळ उडाली आहे.
मिरज शासकीय रुग्णालयात तीन दिवसाचे पुरुष जातीचे नवजात अर्भक चोरीला गेल्याने खळबळ उडाली आहे. प्रसूती विभागातून अज्ञात महिलेने डोस देण्याच्या बहाण्याने अर्भक चोरून नेले. याप्रकरणी गांधी चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कविता समाधान आलदर ही महिला तीन दिवसापूर्वी मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्रसूत होऊन त्यांना मुलगा झाला. सिजेरियन प्रसूती झाली असल्याने आलदर यांच्यावर वार्डात उपचार सुरु होते. शनिवारी सकाळी कविता आलदर या बाळाला सोबत घेऊन झोपल्या असताना त्या ठिकाणी एक अज्ञात महिला आली.  बाळाला डोस द्यायचं असल्याचं सांगून तिने त्या बाळाला नेले. मात्र तासाभरानंतरही बाळ परत आले नसल्याने सर्वत्र शोधाशोध सुरु झाली. 
बाळाला कोणताही डोस द्यायचा नसताना चोरीचा उद्देशाने अज्ञात महिलेने हा प्रकार केल्याचे निष्पन्न झाले. या प्रकारामुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. रुग्णालयातील सीसीटीव्हीत संशयित महिलेचे चित्रण झाले आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रण पाहून महिलेचा शोध सुरु केला आहे.

मुंबई इंडियन्स संघातील माजी खेळाडू शिवालीक शर्मावर बलात्कारासाठी गुन्हा दाखल ;

वेध माझा ऑनलाइन।
आयपीएल 2025 च्या लीग टप्प्यात 19 सामने आता बाकी आहेत आणि आता प्लेऑफची शर्यत मनोरंजक बनली आहे. सीएसके आणि राजस्थान दोन फ्रँचायझी दरम्यानचा प्रवास संपला आहे. आता टॉप -4 पर्यंत पोहोचण्यासाठी 8 संघांमध्ये जोरदार शर्यत चालू आहे. दरम्यान, मुंबई इंडियन्स संघातील माजी खेळाडू शिवालीक शर्मावर जोधपूरमधील कुडी भगतसानी पोलिस ठाण्यात बलात्कारासाठी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2024 मध्ये शिवालीक शर्मा मुंबई इंडियन्सच्या टीमचा एक भाग होता आणि रणजी ट्रॉफीमध्ये बारोडाकडून खेळला आहे.

महिलेचे खळबळजनक आरोप
सहाय्यक पोलिस आयुक्त बोरानदा आनंदसिंग राजपुरोहित म्हणाले की, कुडी भगतसानी येथील रहिवासी असलेल्या महिलेने शिवालीक शर्मावर आरोप केला आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये ती महिला आपल्या मित्रांसह बडोदा फिरायला गेली होती, तेव्हा तिची शिवालिकशी ओळख झाली. मैत्री हळूहळू वाढली आणि मग दोघांनी मोबाइलवर बोलू लागले. यानंतर, दोन्ही कुटुंबे ऑगस्ट 2023 मध्ये भेटली आणि 2023 मध्येच त्यांचा साखरपुडा झाला. मग 2024 शिवालीक शर्मा तिला भेटण्यासाठी जोधपूरला तिच्या घरी आला. जिथे कोणीही नव्हते, महिलेचा नकार असूनही, शिवालीकने लग्न केल्याचे आमिश दाखवले आणि मुलीवर बलात्कार केला. यानंतर, त्याच्याबरोबर बर्‍याच वेळा चुकीचे काम केले. असा आरोप आहे की, शिवालिकने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत गैरकृत्य केले. या काळात शिवालीकने मुलीला मेहंदीपूर बालाजी, जयपूर आणि उज्जैनला फिरायला घेऊन गेला. असा आरोप केला जात आहे की, लग्नाचे आमिष दाखवून शिवालीकने जोधपूरसह अनेक ठिकाणी महिलेशी संबंध ठेवले. 
गेल्या वर्षी जून रोजी, शिवालीक शर्माने लग्नाविषयी बोलण्यासाठी मुलीला वडोदराला बोलावले. जेव्हा ती तरूणी वडोदरात गेली तेव्हा शिवालिकचे वागणे बदललेले दिसत होते. त्यावेळी शिवालिकच्या आई-वडिलांनी तिला खुप सुनावले आणि त्रास पण दिला. त्यांनी सांगितले की, शिवालिक आता क्रिकेटपटू झाला आहे आणि त्याच्यासाठी अनेक मुलींचे प्रस्ताव येत आहेत. असे म्हणत त्यांनी तिच्याशी नाते तोडले आणि मुलीच्या कुटूंबालाही फोनवर माहिती देण्यात आली. इतकेच नव्हे तर त्याने मुलीला घराबाहेर ढकलले. आता पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीवर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

2024 मध्ये मुंबई संघात...
शिवालीक शर्माने रणजी ट्रॉफीमध्ये फलंदाजीने शानदार कामगिरी केली. 2018 मध्ये पदार्पण केल्यानंतर त्याने 18 सामन्यांच्या 27 डावांमध्ये 43.48 च्या सरासरीने 3 शतके आणि 5 अर्धशतकांसह 1087 धावा केल्या. एकेकाळी तो भारतीय क्रिकेटचा उदयोन्मुख स्टार मानला जात असे. या कामगिरीच्या आधारे, मुंबई इंडियन्सने त्याला 2024 मध्ये 20 लाख रुपयांना खरेदी केले. पण, त्याने अलिकडच्या काळात क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे आणि या हंगामापूर्वी मुंबई इंडियन्सने त्याला सोडले.

शिवसेना नेते एकनाथ शिंदेबाबत अभिनेते नाना पाटेकर काय म्हणाले...

वेध माझा ऑनलाईन।
राज्याच्या राजकारणात खूप कमी मंडळी आहेत ज्यांच्यावर कोणताही ठपका नाही, त्यापैकी एक म्हणजे एकनाथ शिंदे अशा शब्दात अभिनेते नाना पाटेकर यांनी शिंदेंवर कौतुकाचा वर्षाव केला.  काही मित्र असे असतात ज्यांच्याकडे पाहून समाधान वाटतं, एकनाथ शिंदे हे त्यापैकीच एक असल्याचं नाना पाटेकर म्हणाले. नाम फाऊंडेशन, टाटा मोटर्स आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने कोयना धरण परिसरात 'गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार' ही योजना राबवली जात आहे. त्याचा शुभारंभ हा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी नाना पाटेकर बोलत होते. 

नाना पाटेकर म्हणाले की, "एकनाथ शिंदे यांना बाळासाहेबांचे शिवसैनिक असल्यापासून ओळखत आहे. आमची मैत्री जुनी आहे, मी त्याच्यांकडे काही मागत नाही. काही राजकीय मंडळी आहेत ज्यांच्यावर कोणतेही ठपके नाहीत, त्यांच्यापैकी एक म्हणजे एकनाथ शिंदे आहेत. शिंदेंनी मुख्यमंत्रिपद भूषवलं, पण कुणीही त्याच्याकडे बोट दाखवू शकत नाही. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोघांना सुद्धा मी जवळून ओळखतो. त्यांचे सुद्धा काम चांगले आहे."

शिवसेना नेते दीपक केसरकर यांचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत ! ; म्हणाले...मी कोणतीही निवडणूक हरलो नाही. यापुढे निवडणूक लढवण्याची इच्छा नाही. तुमचे कायम प्रेम ठेवा."

वेध माझा ऑनलाइन
शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. राजकारण हे निवडणुकांपुरतं असते, पदाला चिकटून राहणारा मी नाही. यापुढे निवडणूक लढवण्याची माझी इच्छा नाही असं जाहीर वक्तव्य दिपक केसरकर यांनी केलं. सावंतवाडीतील एका कार्यक्रमामध्ये त्यांनी हे मत व्यक्त केलं. त्यामुळे दीपक केसरकर राजकारणातून निवृत्ती घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

"निवडणुका आल्यावर विरोधकांना थोडी भीती वाटणार आहे. पण भीती बाळगू नका. मी काही पदाला चिकटून राहणार नाही. जनतेची शक्ती कोणी ओळखू शकत नाही. उद्धव ठाकरे, शरद पवार यांनाही ती ओळखता आली नाही. त्यामुळे मला पक्ष बदलावा लागला. पण कुठेही गेलो तरी निवडून आलो."दीपक केसरकर म्हणाले की, "स्वार्थासाठी राजकारण करु नका, लोकांसाठी राजकारण करा. तसे केल्यास तुम्ही कोणतीही निवडणूक हरणार नाही. मी कोणतीही निवडणूक हरलो नाही. यापुढे निवडणूक लढवण्याची इच्छा नाही. तुमचे कायम प्रेम ठेवा." 

माजी मुख्यमंत्र्यांची अजित पवारांनी मागितली माफी ; काय आहे बातमी?

 वेध माझा ऑनलाइन
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं मुंबईत गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव आयोजित केला आहे. या महोत्सवात राज्याच्या आजी माजी मुख्यमंत्र्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री  नारायण राणे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण उपस्थित होते. या कार्यक्रमाला मविआशी संबंधित माजी मुख्यमंत्री उपस्थित राहिले नाहीत. शरद पवार, उद्धव ठाकरे, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण हे उपस्थित राहिले नाहीत. शरद पवार यांच्याकडून निमंत्रण मिळालं नसल्यानं उपस्थित राहण्याचा प्रश्न नाही असं सांगण्यात आलं. याचाच धागा पकडत अजित पवार यांनी आपण माजी मुख्यमंत्री यांना बोलावल होतं. यदा कदाचित आमच्याकडून चुकून कुणाला माजी मुख्यमंत्री यांना निमंत्रण देण राहिलं असेल तर माफी मागतो दिलगिरी व्यक्त करतो, असं म्हटलं. यावेळी अजित पवार यांनी शरद पवार यांचं नाव घेणं टाळल्याचं पाहायला मिळालं.

गेली 35 वर्ष काम करण्याची संधी मिळाली. राजीव गांधी यांच्या काळात बारामती लोकसभा मतदारसंघातून पहिली संधी मिळाली. सुधाकर नाईक यांच्या मंत्रिमंडळात काम केलं. शरद पवारांचा मुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ पाहिला, असं अजित पवार म्हणाले. आज बरेच मुख्यमंत्री इथ नाहीत. मी अशोक चव्हाण यांचा कार्यकाळ पाहिला. विदर्भाला चांगल्या प्रकारे संधी मिळाली मराठवाड्यात देखील मान्यवरांना संधी मिळाली पश्चिम महाराष्ट्रात देखील संधी मिळाली. कोकणालही संधी मिळाली.  ६५ वर्षानंतर महिला मुख्यमंत्री झाली नाही. आम्हालाही वाटत महिला मुख्यमंत्री व्हायला हवी. केवळ उत्तर महाराष्ट्राला मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली नाही. 2004 साली ती संधी आली होती मात्र काय झालं हे प्रफुल पटेल यांना माहिती आहे, असं अजित पवार म्हणाले.
मुख्यमंत्र्याचा दरारा काय असू शकतो हे मी नारायण राणे यांच्या रूपाने पाहिलं आहे. विरोधी पक्षनेता म्हणून सुद्धा मी पाहिलं नारायण राणे यांनी सभागृहात नुसतं मागे पाहिलं तरी सगळे शिवसेना आमदार चिडीचूप होऊन जायचे, असं अजित पवार म्हणाले. अशोक चव्हाण आणि मी एकाच बॅचचे आहोत, त्यांना कमी कार्यकाळ मिळाला, असं अजित पवार म्हणाले.

महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी प्रकाश जाधव यांची निवड

वेध माझा ऑनलाइन।
परिट समाजाचे राष्ट्रीय अधिवेशन 9 मार्च 2025 रोजी शिर्डी येथे संपन्न झाले होते. यावेळी नूतन प्रदेशाध्यक्ष म्हणून खंडेराव कडलग यांची बिनविरोध निवड झाली होती. यावेळी राज्य कार्यकारिणी निवडीचे अधिकार प्रदेशाध्यक्ष कडलग यांना देण्यात आले होते. यावेळी प्रत्येक पदासाठी राज्यातून सुमारे पाच ते दहा अर्ज व शिफारशी आलेल्या होत्या. परीट समाजाची माजी प्रदेशाध्यक्ष, ज्येष्ठ पदाधिकारी, ज्येष्ठ मार्गदर्शक यांच्या मार्गदर्शन व विचाराने या राज्याच्या निवडी करण्यात आल्या असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष खंडेराव कडलग यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. 

सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून प्रकाश जाधव मेहरबान हे गेली 14 वर्षे काम पाहत असून त्यांनी या काळात परीट समाजासाठी दिलेल्या बहुमूल्य योगदानामुळे त्यांची प्रदेश उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातून समाजाचे काम राज्य पातळीवर दखलपात्र झाले असून समाजाने दिलेल्या संधीचे सोने करत समाजाच्या प्रत्येक कार्यामध्ये स्वतःला झोकून देऊन प्रकाश जाधव यांनी काम केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना राज्य कार्यकारिणीमध्ये प्रदेश उपाध्यक्ष म्हणून संधी देण्यात आले आहे. यावेळी बोलताना प्रकाश जाधव म्हणाले की महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळाचे नूतन प्रदेशाध्यक्ष खंडेराव कडलग, माजी प्रदेशाध्यक्ष राजेंद्रशेठ खैरनार   , राष्ट्रीय उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे सर, कार्याध्यक्ष सनथ वाढाई (गोंदिया), प्रदेश महासचिव सुनील फंड (अहिल्या नगर), सहसचिव रवींद्र कणेकर (कोकण), सहसचिव रवींद्र अंदुरेकर (अकोला), कोषाध्यक्ष सुधीर पाटोळे (पुणे) यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवत प्रदेश उपाध्यक्षपदी निवड केली आहे. त्या विश्वासात पात्र राहून यापुढेही समाजासाठी काम करणार आहे. 
सातारा जिल्ह्यातील मला साथ देणारे आमचे मार्गदर्शक बबनराव शिंदे आप्पा,संत गाडगे महाराज सेवा मंडळाचे अध्यक्ष शामराव सोनटक्के,माजी अध्यक्ष भिकू राक्षे,दिलीप नलवडे, व जिल्हा पदाधिकारी व समाज बांधव 
यांचे बहुमोल मार्गदर्शन निश्चित राहील व यांच्या पाठिंब्यावरच समाजासाठी भरीव काम करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे. 
या निवडीबद्दल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते उदयसिंह पाटील, कराड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष जयवंतराव पाटील व जिल्ह्यातील परीट समाजांनी या निवडीबद्दल अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.