Monday, April 27, 2026

ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील, समाजसेविका डॉ. भाग्यश्री कुलकर्णी आणि डॉ. अंजनी शहा यांना पुरस्कार प्रदान ; श्री कालिकादेवी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने प्रतिष्ठित पुरस्कारांनी केला सन्मान ;

वेध माझा ऑनलाईन
समाजातील सकारात्मक कार्याची दखल घेत श्री कालिकादेवी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित पुरस्कारांनी यंदा साहित्य, सामाजिक सेवा आणि आदिवासी क्षेत्रातील कार्याला विशेष सन्मान मिळाला. ज्येष्ठ साहित्यिक विश्वासराव पाटील, समाजसेविका डॉ. भाग्यश्री कुलकर्णी आणि डॉ. अंजनी शहा यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी या तिघांच्या कार्याचा गौरव करत, ही तिन्ही व्यक्तिमत्त्वे महाराष्ट्रातील खऱ्या अर्थाने समाजरत्ने आहेत, असे उद्गार काढले. साहित्य, मनोरुग्ण व अनाथांसाठी सेवा, तसेच वनवासी भागातील शिक्षण-आरोग्य क्षेत्रातील योगदान यामुळे त्यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी ठरल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून इंद्रजित देशमुख उपस्थित होते. त्यांनी संस्थेच्या उपक्रमांचे कौतुक करत, समाजातील चांगल्या विचारांना चालना देणाऱ्या संस्थांची गरज आज अधिक आहे. गेली १३ वर्षे सातत्याने हा विचार जपण्याचे कार्य या संस्थेने केले आहे, असे सांगितले.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक विश्वासराव पाटील यांनी, आपल्या मनोगतात साहित्याच्या सामाजिक बांधिलकीवर भाष्य केले. लेखन करताना इतिहास आणि समाजाचा सखोल अभ्यास आवश्यक असतो. साहित्य हे समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे, असे त्यांनी सांगितले.
पुरस्कार स्वीकृतीनंतर डॉ. भाग्यश्री कुलकर्णी आणि डॉ. अंजनी शहा यांनीही आपल्या कार्यातील अनुभव मांडले. भाग्यश्री कुलकर्णी यांनी, गेली २४ वर्षे मनोरुग्ण, अनाथ बालके आणि वृद्धांसाठी केलेल्या सेवाकार्याचा उल्लेख केला, तर डॉ. अंजनी शहा यांनी, वनवासी भागातील शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील आव्हाने आणि कार्याचा प्रवास उलगडला.
या समारंभात विश्वासराव पाटील व डॉ. भाग्यश्री कुलकर्णी यांना ‘यशवंतराव चव्हाण सामाजिक कृतज्ञता पुरस्कार’, तर डॉ. अंजनी शहा यांना ‘स्व. सौ. वेणुताई चव्हाण महिला शक्ती गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
याशिवाय, डॉ. अभय कुलकर्णी, डॉ. अनिल शहा आणि स्नेहा फडणीस यांचा विशेष सत्कार करण्यात आला. म.सा.प. शाखा शहापुरीच्या वतीने मुनीर बागवान सावकार आणि विवेक वेळापुरे यांनाही सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अशोक चव्हाण यांनी केले, विवेक वेळापुरे यांनी प्रास्ताविक केले. आभार डॉ. संतोष मोहिरे यांनी मानले. या सोहळ्यास संस्थेचे पदाधिकारी, संचालक मंडळ सदस्य, साहित्यिक, कवी, सभासद व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment