कृष्णा नदीच्या पाण्याचा रंग गेल्या अनेक दिवसांपासून निळसर-हिरवा होत असल्याचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर बनत असतानाही संबंधित प्रशासनाकडून कोणतीही ठोस भूमिका घेतली जात नसल्याचे चित्र कायम आहे. अद्याप नदीच्या पाण्याची अधिकृत तपासणी, अहवाल किंवा कारणमीमांसा जाहीर करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.त्यामुळे वेध माझा' हा विषय लावून धरणार आहे...कारण प्रश्न लोकांच्या आरोग्याचा आहे...
कृष्णा नदीवर परिसरातील लाखो नागरिकांचे पिण्याचे पाणी, शेती, पशुपालन आणि विविध उद्योग अवलंबून आहेत. अशा महत्त्वाच्या नदीच्या पाण्याचा रंग अचानक बदलल्यानंतर तातडीने वैज्ञानिक तपासणी होणे अपेक्षित होते. मात्र अनेक दिवस उलटूनही प्रशासनाकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
नदीकाठच्या विविध भागांत अजूनही पाण्यावर हिरवट थर दिसून येत असल्याचे नागरिक सांगत आहेत. काही ठिकाणी पाणी पूर्णपणे निळसर-हिरव्या रंगाचे दिसत असल्याने जलप्रदूषण, शैवालांची वाढ, रासायनिक घटकांचे प्रमाण किंवा औद्योगिक अथवा सांडपाण्याचा परिणाम अशा विविध शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. मात्र याबाबत कोणताही अधिकृत खुलासा नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आणि भीतीचे वातावरण आहे.विशेष म्हणजे, इतका संवेदनशील विषय समोर आल्यानंतरही आमदार खासदार लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष नदीपात्राची पाहणी करून प्रशासनाकडून अहवाल मागविल्याचे दिसून आलेले नाही. त्यामुळे "नदीचा प्रश्न हा केवळ पर्यावरणाचा नाही, तर जनतेच्या आरोग्याचा आहे," अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
पर्यावरणप्रेमी, शेतकरी आणि नदीकाठच्या ग्रामस्थांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जलसंपदा विभाग, आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासन यांनी संयुक्तपणे तातडीने पाण्याचे नमुने तपासून त्याचा अहवाल सार्वजनिक करावा, तसेच रंगबदलामागील नेमके कारण जाहीर करून आवश्यक उपाययोजना हाती घ्याव्यात, अशी मागणी पुन्हा एकदा केली आहे.
दरम्यान, 'वेध माझा'कडून या गंभीर विषयाचा सातत्याने पाठपुरावा सुरू राहणार असून, नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित या प्रश्नावर प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
No comments:
Post a Comment