Tuesday, June 30, 2026

शासनाकडून कराड नगरपरिषदेला जेटिंग मशीन व फायर व्हेईकलची भेट; नगराध्यक्षांच्या हस्ते लोकार्पण

वेध माझा ऑनलाईन  : 
शहरातील स्वच्छता व्यवस्था आणि अग्निसुरक्षा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने कराड नगरपरिषदेला शासनाकडून जेटिंग मशीन व लहान आकाराचे फायर व्हेईकल अशी दोन महत्त्वाची वाहने प्राप्त झाली आहेत. या वाहनांचे लोकार्पण नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.

यावेळी बोलताना नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी सांगितले की, शहरातील भुयारी गटारांची प्रभावी स्वच्छता करण्यासाठी नव्याने प्राप्त झालेली जेटिंग मशीन अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या मशीनची क्षमता ८ हजार लिटर असून तिची किंमत सुमारे १ कोटी रुपये आहे. तसेच लहान रस्ते, बोळ आणि अरुंद भागांमध्ये आग लागल्यास तातडीने पोहोचून आग विझवण्यासाठी नव्याने मिळालेले फायर व्हेईकल महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या वाहनाची किंमतही सुमारे १ कोटी रुपयांच्या आसपास असल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय भविष्यात ३ हजार लिटर क्षमतेची आणखी एक जेटिंग मशीन तसेच मोठ्या क्षमतेचे फायर व्हेईकलही नगरपरिषदेला उपलब्ध होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील गटारांची स्वच्छता, साचलेल्या पाण्याचा निचरा आणि आपत्कालीन अग्निशमन सेवेसाठी ही दोन्ही वाहने अत्यंत उपयुक्त ठरतील, असा विश्वासही नगराध्यक्ष यादव यांनी व्यक्त केला.
लोकार्पण कार्यक्रमास नगरसेवक, नगरसेविका, नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment