Wednesday, June 24, 2026

कृष्णा नदीच्या रंगबदलाकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष; नागरिकांमध्ये संताप,; अनेक दिवसांपासून चर्चेत असतानाही लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष नदीपात्राची पाहणी केली नसल्याची खंत ; तातडीच्या कारवाईची मागणी

वेध माझा ऑनलाईन।
कृष्णा नदीच्या पाण्याचा रंग गेल्या काही दिवसांपासून निळसर-हिरवा होत असल्याची बाब समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. मात्र या गंभीर प्रश्नावर अद्यापही स्थानिक आमदार, खासदार आणि संबंधित लोकप्रतिनिधींनी ठोस भूमिका घेतलेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

कृष्णा नदी ही पश्चिम महाराष्ट्रातील लाखो नागरिकांची जीवनवाहिनी मानली जाते. शेती, पिण्याचे पाणी, उद्योगधंदे आणि दैनंदिन वापरासाठी मोठ्या प्रमाणावर या नदीच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. अशा परिस्थितीत नदीच्या पाण्याचा रंग अचानक बदलणे ही गंभीर बाब मानली जात असतानाही प्रशासन आणिलोकप्रतिनिधींकडून अपेक्षित गांभीर्य दिसून येत नसल्याची टीका नागरिकांकडून होत आहे.

दरम्यान, नदीच्या रंगबदलाचा प्रश्न अनेक दिवसांपासून चर्चेत असतानाही लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष नदीपात्राची पाहणी केलेली नसल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत. "नदीचे आरोग्य धोक्यात आले तर त्याचा परिणाम संपूर्ण परिसरावर होणार आहे. त्यामुळे राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे आवश्यक आहे," अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी दिली.

नदीकाठच्या अनेक भागांमध्ये पाण्याच्या पृष्ठभागावर हिरवट थर दिसत असून, काही ठिकाणी पाण्याचा रंग पूर्णपणे निळसर-हिरवा झाल्याचे चित्र आहे. यामुळे जलप्रदूषण, शैवालांची वाढ किंवा सांडपाण्याचे मिश्रण याबाबत विविध शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. मात्र अद्याप अधिकृत तपासणी अहवाल समोर आलेला नाही.

स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जलसंपदा विभाग आणि जिल्हा प्रशासनाने तातडीने संयुक्त पाहणी करून पाण्याचे नमुने तपासावेत, अशी मागणी केली आहे. तसेच तपासणी अहवाल सार्वजनिक करून नागरिकांमधील संभ्रम दूर करावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.

कृष्णा नदीच्या पाण्याच्या रंगबदलामागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट असले तरी या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे प्रशासनासह लोकप्रतिनिधींनीही या विषयात लक्ष घालून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी दिवसेंदिवस तीव्र होत आहे.

आता प्रशासनाची तपासणी, लोकप्रतिनिधींची भूमिका आणि पुढील उपाययोजना याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागून राहिले आहे.

No comments:

Post a Comment