कृष्णा नदीच्या पाण्याचा रंग गेल्या काही दिवसांपासून निळसर-हिरवा होत असल्याबाबत नागरिकांनी वारंवार चिंता व्यक्त केली असून या गंभीर विषयाची अद्याप संबंधित प्रशासन किंवा लोकप्रतिनिधींनी दखल घेतलेली नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
कृष्णा नदी ही परिसरातील लाखो नागरिकांच्या जीवनाशी थेट जोडलेली आहे. पिण्याचे पाणी, शेती, पशुपालन आणि विविध उद्योगांसाठी या नदीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावे लागते. अशा परिस्थितीत नदीच्या पाण्याचा रंग बदलल्याची बाब समोर आल्यानंतर तातडीने तपासणी होणे अपेक्षित होते. परंतु अनेक दिवस उलटूनही अधिकृतरीत्या कोणतीही ठोस माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.
त्यामुळे वेध माझा ने हा विषय उचलून धरला आहे...कारण, प्रश्न नागरीकांच्या जीवाचा आहे...
नदीकाठच्या विविध भागांत अजूनही पाण्याच्या पृष्ठभागावर हिरवट थर दिसून येत असून काही ठिकाणी पाणी पूर्णपणे निळसर-हिरव्या रंगाचे असल्याचे नागरिक सांगत आहेत. या प्रकारामुळे जलप्रदूषण, शैवालांची वाढ, रासायनिक घटकांचे प्रमाण वाढणे किंवा सांडपाण्याचे मिश्रण अशा विविध शक्यतांबाबत चर्चा सुरू आहे. मात्र अधिकृत तपासणी अहवाल नसल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम कायम आहे.
विशेष म्हणजे, हा विषय सार्वजनिक चर्चेत आल्यानंतरही स्थानिक आमदार, खासदार किंवा इतर प्रमुख लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष नदीपात्राची पाहणी केल्याचे समोर आलेले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. "नदीच्या आरोग्याचा प्रश्न हा राजकारणापलीकडचा आहे. या विषयावर सर्वांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे," अशी प्रतिक्रिया पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जलसंपदा विभाग आणि जिल्हा प्रशासन यांनी संयुक्तपणे तातडीने पाण्याचे नमुने तपासून अहवाल जाहीर करावा, अशी मागणी आता अधिक तीव्र झाली आहे. तसेच नदीच्या रंगबदलामागील नेमके कारण आणि त्याचा पर्यावरण व मानवी आरोग्यावर होणारा परिणाम याबाबत स्पष्ट माहिती देण्याचीही मागणी होत आहे.
कृष्णा नदीच्या पाण्याच्या रंगबदलाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना संबंधित यंत्रणांची शांतता आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष यामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढत आहे. आता तरी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जागे होऊन या विषयावर ठोस भूमिका घेणार का, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
No comments:
Post a Comment