सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांनी विजय मिळवला असला, तरी निकालाने राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. कदम यांना ५९३ मते मिळाली, तर महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांना २९२ मते मिळाली. संख्याबळाच्या तुलनेत महाविकास आघाडीला अपेक्षेपेक्षा अधिक मते मिळाल्याने महायुतीची सुमारे १०० मते फुटल्याचे स्पष्ट झाले असून, यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
निवडणुकीपूर्वी उपलब्ध असलेल्या पक्षनिहाय संख्याबळानुसार भाजपकडे ३२५, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) २०५, शिवसेना (शिंदे गट) ११६ अशी महायुतीची एकूण ६४६ मते होती. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) १२०, काँग्रेस ७४ आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) १ असे मिळून महाविकास आघाडीकडे १९५ मते होती.
याशिवाय स्थानिक आघाड्या आणि अपक्षांची ५४ मते होती. यापैकी बहुतांश मते महायुतीच्या बाजूने जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला सहज विजय मिळेल, असा अंदाज होता.
निकालात मात्र वेगळे चित्र दिसून आले. अभयसिंह जगताप यांना मिळालेली २९२ मते ही महाविकास आघाडीच्या मूळ संख्याबळापेक्षा लक्षणीय अधिक आहेत. त्यामुळे महायुतीतील काही सदस्यांनी क्रॉस व्होटिंग केल्याची चर्चा रंगू लागली आहे. अंदाजे ९० ते १०० मते महायुतीतून फुटल्याचा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे.
धैर्यशील कदम यांचा विजय झाला असला तरी अपेक्षित मतांपेक्षा कमी मते मिळाल्याने महायुतीसमोर अंतर्गत नाराजी, स्थानिक पातळीवरील गटबाजी आणि मतदारांच्या भूमिकेबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. दुसरीकडे पराभव होऊनही अभयसिंह जगताप यांनी मिळवलेली अतिरिक्त मते महायुतीला विचार करायला लावणारी आहेत.
हा निकाल केवळ जय-पराभवाचा नाही, तर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय समीकरणांमध्ये बदल होत असल्याचा संकेत आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळालेली अतिरिक्त मते भविष्यातील राजकारणासाठी महत्त्वाची ठरतील, असे राजकीय जाणकार सांगत आहेत.
No comments:
Post a Comment