Wednesday, June 24, 2026

कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत जयवंतराव भोसले सहकार पॅनलची विजयाची हॅट्रिक ; १४ हजार ५०० हून अधिक विक्रमी मताधिक्याने ऐतिहासिक विजय;

वेध माझा ऑनलाईन।
महाराष्टाचे लक्ष लागून राहिलेल्या रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत जयवंतराव भोसले सहकार पॅनलने तब्बल १४ हजार ५०० हून अधिक विक्रमी मताधिक्याने ऐतिहासिक विजयाची हॅट्रिक साधली. या देदीप्यमान विजयामुळे कारखाना परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, कार्यकर्त्यांनी कारखाना कार्यस्थळावर चेअरमन डॉ. सुरेश भोसले  यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. 

कृष्णा कारखान्याच्या या अत्यंत प्रतिष्ठेच्या निवडणुकीच्या निकालात चेअरमन डॉ. सुरेश भोसले आणि आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या नेतृत्वाखालील जयवंतराव भोसले सहकार पॅनलने सर्व २१ जागांवर दणदणीत विजय मिळवत विरोधी संस्थापक पॅनलचा धुव्वा उडवला. या ऐतिहासिक यशानंतर कारखाना परिसरात कार्यकर्ते, सभासद आणि समर्थकांनी एकच जल्लोष केला.

दरम्यान, आज सकाळी चेअरमन डॉ. सुरेश भोसले व श्री. विनायक भोसले यांचे कारखाना कार्यस्थळावर आगमन होताच त्यांचे स्वागत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. फटाक्यांची आतषबाजी, घोषणाबाजी आणि अभिनंदनाच्या वर्षावात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

यावेळी कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारताना डॉ. सुरेश भोसले म्हणाले की, हा विजय कारखान्याच्या प्रगतीवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक सभासद आणि कार्यकर्त्यांचा आहे. येत्या काळात कृष्णा कारखान्याला आणखी प्रगतीपथावर नेऊन राज्यातील आदर्श सहकारी साखर कारखाना म्हणून अधिक सक्षम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

यावेळी नवनिर्वाचित संचालक बाबासो शिंदे, छबन कांबळे, संग्राम पाटील, बाजीराव थोरात, सत्यजित पाटील, बाळासो जगताप, माजी संचालक संजय पाटील, विलास भंडारे, दिलीप पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे संजय पाटील, महिला जिल्हाध्यक्ष सुश्मिता जाधव, कराड पं. स. सभापती नंदाताई यादव, जिल्हा परिषद सदस्या शैलजा शिंदे, कराडच्या माजी नगराध्यक्ष रोहिणी शिंदे, शिवाजीराव थोरात, राजेंद्र माने, प्रकाश पाटील, प्रकाश देसाई, धनाजी जाधव, रमेश मोहिते, कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सी. एन. देशपांडे, मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार, एम. के. कापूरकर यांच्यासह कराड, वाळवा व कडेगाव परिसरातील कार्यकर्ते व शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments:

Post a Comment