Wednesday, October 21, 2026

अतुलबाबांनी आज सांगूनच टाकले ; म्हणाले...‘उदयदादांनाच मदत करणार’; धनंजय पाटलांना अतुलबाबांचा स्पष्ट नकार! जिल्हा बँकेतील राजकीय संभ्रमाला पूर्णविराम; अध्यक्षपदाच्या चर्चेवर मात्र अतुलबाबांची सावध भूमिका ;

 वेध माझा ऑनलाईन।
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत प्रक्रिया गटातून बिनविरोध निवडून आलेले कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी जिल्हा बँकेच्या राजकारणातील आपली भूमिका आज स्पष्ट केली . ‘यंदाच्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सोसायटी गटात आम्ही ऍड उदयदादांनाच मदत करणार आहोत,’ असे ठामपणे सांगत त्यांनी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष धनंजय पाटील यांना या गटात मदत करणार नसल्याचे स्पष्ट केले. 

सुरेशबाबांच्या नेतृत्वात या निवडणुकीत ऍड उदयदादा पाटील यांनाच मदत करण्याचे आमचे अगोदरच ठरले आहे... राजकारणात एकदा भूमिका स्पष्ट केली... की, त्यात बदल होत नसतो... त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार म्हणून उदयदादा यांनाच आम्ही मदत करणार आहोत आणि हीच आमची स्पष्ट भूमिका आहे असे सांगुन अतुलबाबांनी धनंजय पाटील याना मदत करण्याबाबत स्पष्ट नकारच दिला...

धंनजय पाटील हे आमदार अतुलबाबांचे जवळचे मानले जातात ते भाजपचे जिल्ह्याचे उपाध्यक्षही आहेत त्यांनीही या निवडणुकीत सोसायटी गटातूनच महायुतीचे उमेदवार अजितदादा गटाचे कराड तालुक्यातील नेते ऍड उदयदादा पाटील यांच्या विरोधात आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्यामुळे यावेळच्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अतुलबाबा नेमकी कोणाची बाजू घेणार, यावरून उलटसुलट चर्चा सुरू होत्या मात्र अतुलबाबांनी याबाबतची आपली भूमिका आज स्पष्ट केल्याने या सगळ्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

आमदार अतुलबाबा भोसले यांची जिल्हा बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांनी कराड येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधिस्थळी अभिवादन केले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील भूमिकेबाबत हा महत्त्वपूर्ण खुलासा केला.


जिल्हा बँकेच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून विविध नेत्यांच्या भूमिका, गटांतर्गत समीकरणे आणि संभाव्य पाठिंब्याबाबत चर्चा सुरू होती. त्यात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष धनंजय पाटील यांनी याच गटातून बंडखोरी केल्याच्या पार्श्वभूमीवर अतुलबाबा कोणाला साथ देणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र, उदयदादांना मदत करण्याची भूमिका स्पष्ट करून अतुलबाबांनी या चर्चेतील संभ्रम दूर केला.


जिल्हा बँकेच्या संचालकपदी निवड झाल्यानंतर बोलताना अतुलबाबा म्हणाले, “जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी या बँकेच्या माध्यमातून यशस्वी राजकीय कारकीर्द घडवली आहे. आता आम्हा तरुणांना या बँकेत काम करण्याची संधी मिळत आहे.” या संधीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व नेत्यांचे त्यांनी आभार मानले.

दरम्यान, जिल्हा बँकेच्या आगामी निवडणुकीनंतर अध्यक्षपदासाठी अतुलबाबा भोसले यांच्या नावाची चर्चा होत आहे. शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि जयकुमार गोरे यांनीही त्यांच्या नावाचा उल्लेख केल्याबाबत पत्रकारांनी विचारले असता, “मला याबाबत अद्याप तरी माहिती नाही. या गोष्टींना अजून वेळ आहे. त्याबाबत आत्ताच चर्चा नको,” अशी सावध प्रतिक्रिया त्यांनी दिली.
एकूणच जिल्हा बँकेच्या राजकारणात पाठिंब्याबाबतची भूमिका स्पष्ट झाली असली, तरी अध्यक्षपदाच्या संभाव्य समीकरणांबाबत अतुलबाबांनी तूर्तास मौन राखले आहे. संचालकपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष लागले असून, आगामी काळात जिल्हा बँकेच्या राजकारणात कोणती समीकरणे आकाराला येतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

No comments:

Post a Comment