Saturday, November 20, 2021

कराड ठरले देशपातळीवर पश्चिम विभागातील प्रथम क्रमांकाचे स्वच्छ शहर ; कचरामुक्त शहर म्हणूनही सन्मान...

वेध माझा ऑनलाइन
कराड
केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण ,2019 व 2020 मध्ये देशपातळीवर पहिला क्रमांक पटकावणाऱ्या कराड नगरपालिकेने पश्चिम विभागातील प्रथम क्रमांकाचे शहराचे पारितोषिक पटकावले आहे. तसेच कचरामुक्त शहराचे थ्री स्टार मानांकनाचे पारितोषिक ही पटकावले आहे.

नवी दिल्ली येथे विज्ञान भवनमध्ये केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण शनिवारी करण्यात आले. नगराध्यक्ष रोहिणी शिंदे, आरोग्य सभापती विजय वाटेगावकर, महिला व बालकल्याण सभापती स्मिता हुलवान, नोडल ऑफिसर रफिक भालदार, अभियंता एस. आर. पवार आदींनी हे पुरस्कार स्वीकारले.
कराड नगरपालिकेने 2019 व 2020 या दोन वर्षात पश्चिम विभागात देशपातळीवर पहिला क्रमांक मिळवला होता. या वर्षी हॅट्ट्रिक करण्याच्या निर्धाराने नगरपालिका स्वच्छ सर्वेक्षणमध्ये उतरली होती. मात्र यावर्षी हॅटट्रिक साधण्यात यश आले नसून लहान शहरांमध्ये विटा नगरपालिकेने देश पातळीवर पहिला क्रमांक पटकावला आहे. तर कराड सहाव्या क्रमांकावर आहे. मात्र पश्चिम विभागातील स्वच्छ शहर म्हणून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळविण्यात पालिका यशस्वी झाली आहे. तर कचरामुक्त शहराचे थ्री स्टार मानांकनाचे पारितोषिकही पालिकेने मिळवले आहे. तसेच हागणदारीमुक्त शहराचे आओडीएफ प्लस, प्लस मानांकनही  पालिकेने मिळवले आहे. 
यावर्षी या स्पर्धे अंतर्गत कराड नगरपालिकेच्या कामगिरीची दखल घेत प्रेरक दौंड सन्मान पालिकेस मिळाला असून या सन्मानाच्या गोल्ड क‌‌टेगरीत कराड नगरपालिकेचा समावेश झाला आहे.
यावर्षी मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिका या स्पर्धेत उतरली होती. नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील, जनशक्ती आघाडीचे गटनेते राजेंद्रसिंह यादव, भाजपचे गटनेते विनायक पावसकर, लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील, सर्व सभापती, नगरसेवक, नगरसेविका, पालिकेचे अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता दूत, सर्व सामाजिक संस्था,  स्वयंसेवी संस्था, कराडकर नागरिक, महिला, विद्यार्थ्यी यांचेही योगदान लाभले आहे.

No comments:

Post a Comment