Thursday, November 18, 2021

मतदार नोंदणीसाठी प्रत्येक महाविद्यालयात विशेष शिबीराचे आयोजन ; 27 व 28 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात मतदार नोंदणीसाठी विशेष शिबीराचे आयोजन ; जिल्हाधिकारी

 सातारा ,दि.18 (जिमाका) :  महाविद्यालयातील एकही पात्र विद्यार्थी मतदार नोंदणी पासून वंचित राहणार नाही यासाठी  महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी विशेष शिबीरांचे आयोजन करावे. या शिबीरांमध्ये जास्तीत जास्त व्होटर हेल्पलाईन ॲपचा वापर करुन नव मतदारांची नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमात महाविद्यालयांचा सहभाग यासाठी आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी शेखर सिंह बोलत होते. या बैठकीला उपजिल्हा निवडणूक अधिकारी निता शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, एन.एस.एस. प्रमुख उपस्थित होते.

जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले, 1 नोव्हेंबर 2021 रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यापुर्वी ज्या विद्यार्थ्यांनी मतदार यादीत नावाची नोंद केली असल्यास ती तपासून पहावी. महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी महाविद्यालयातील किती विद्यार्थ्यांनी नावाची नोंदणी केली किती जण शिल्लक याची माहिती तयार करावी. तसेच ज्यांनी मतदार यादीत नावाची नोंदणी केली नाही, अशा विद्यार्थ्यांना मतदार यादीत नाव नोंदणीसाठी प्रवृत्त करावे.  

27 व 28 नोव्हेंबर 2021 रोजी जिल्ह्यात विशेष मोहिम राबविण्यात येणार असून प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बी.एल.ओ.) यांच्यामार्फत नवीन मतदारांचे अर्ज भरण्यात येणार आहे.  याचा जिल्ह्यातील नवमतदारांनी लाभ घ्यावा. तसेच जिल्ह्यातील प्रत्येक महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी मतदार नोंदणीचे विशेष शिबीरांचे आयोजन करण्यात येणार आहे या शिबीरांमध्ये महाविद्यालयींन युवकांनी सहभाग घेऊन नावे मतदार यादीत नोंदवावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.

यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी निता शिंदे यांनी नवमतदार नोंदणीबाबतची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.
0000

No comments:

Post a Comment