Wednesday, November 17, 2021

सोमवार पेठेत पाण्याच्या टाकीखालील बागेचे लोकार्पण...

वेध माझा ऑनलाइन
कराड
येथील सोमवार पेठेतील पाण्याच्या टाकीखालील जागेत माझी वसुंधरा अभियानांतर्गत नगरपालिका आणि लोकसहभागातून साकारलेल्या बागेचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले. उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील, जनशक्तीचे गटनेते राजेंद्रसिंह यादव, लोकशाहीचे गटनेते सौरभ पाटील, ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, नगरसेविका विद्या पावसकर, आरोग्य सभापती विजय वाटेगावकर, नगरसेवक सुहास जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.  

सोमवार पेठेत बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीखाली मोकळी जागा होती. या जागेचा गैरवापर होत होता. त्यामुळे या जागेत माझी वसुंधरा अभियानांतर्गत कारंजा प्रस्तावित करण्यात आला. कारंजाची उभारणी केल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी पाथ वे, बसायला बाकडी ठेवण्यात आली. झाडे लावणे शक्य नसल्याने टाकीच्या खांबांवर झाडे, पशुपक्ष्यांची चित्रे काढून त्यास बागेचे रूप देण्यात आले. या बागेची संकल्पना पाहून काही नागरिकांनी वर्गणी दिली. या वर्गणीतून लहान मुलांसाठी खेळणी बसवली आहेत. तर नागरिकांना व्यायाम करण्यासाठी ओपन जिमचे साहित्यही बसवण्यात आले आहे. लहान मुले येत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना केल्या असून संपूर्ण बाग बंदिस्त करण्यात आली आहे. मोकळया जागेचा असा अभिनव वापर झाल्याने सोमवार पेठेतील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.  

कार्यक्रमास मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनीही भेट दिली. याशिवाय नगरसेवक आप्पा माने, इंद्रजित गुजर, फारूक पटवेकर, नगरसेविका अंजली कुंभार, जयंत बेडेकर, व्ही. के. कुलकर्णी, प्रा. कुलकर्णी, ए. आर. पवार, चंद्रकांत जिरंगे,  प्रकाश जाधव, दीपक पाटील, सौ रसिका पंडित तसेच अनेक महिला उपस्थित होत्या.  
दरम्यान, या बागेसाठी नगरपालिका व नागरिकांचे सहकार्य लाभले आहे. आता ही संपूर्ण पाण्याची टाकी रंगवून त्यांवर चित्रे काढण्याचे कामही हाती घेण्यात येणार आहे. नगरपालिकेने टाक्या रंगवण्याबाबत ठराव केला असल्याची माहिती ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर यांनी दिली.

No comments:

Post a Comment