Friday, November 26, 2021

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या निर्बंधात आणखी शिथिलता...

सातारा दि. 26 (जिमाका) : सातारा जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या निर्बंधामध्ये शिथीलता देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी निर्गमित केले असून हे आदेश 27 नोव्हेंबर  पासून पुढील आदेश होईपर्यंत लागू राहतील.

  उपहारगृहे : 

खुली अथवा बंदिस्त उपहारगृहे आसन व्यवस्थेच्या 50 टक्के क्षमतेने खालील अटींच्या पूर्ततेच्या अधीन राहून सुरु करण्याची मुभा देण्यात येत आहे.  उपहारगृह, बारमध्ये प्रवेश करताना, प्रतिक्षा कक्षात अथवा जेवण मिळेपर्यंतच्या कालावधीत मास्कचा वापर अनिवार्य राहिल . व याबाबतच्या स्पष्ट सूचना उपहारगृह आस्थापनांनी उपहारगृहात लावणे आवश्यक राहिल. उपहारगृह, बारमध्ये काम करणारे आचारी, वाढपे, व्यवस्थापक व स्वच्छता कर्मचाऱ्यांसह सर्व कर्मचाऱ्यांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण करणे आवश्यक राहिल व ज्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाच्या दोन मात्रा आणि दुसरी मात्रा घेतल्यानंतर 14 दिवस पुर्ण झाले आहे असेच कर्मचारी व व्यवस्थापक उपहारगृह, बारमध्ये काम करू शकतील तसेच या सर्व कर्मचारी व व्यवस्थापनाने उपहारगृहात मास्कचा वापर करणे अनिवार्य राहिल.  वातानुकुलित उपहारगृह, बार असल्यास, वायुवीजनासाठी खिडक्या असल्यास कमीत कमी दोन खिडक्या किंवा दरवाजा उघडा ठेवून आतील हवा खेळती राहण्यासाठी पंखे लावणे आवश्यक राहिल.  प्रसाधनगृहातही उच्च क्षमतेचा एक्झॉस्ट फॅन असणे आवश्यक राहिल.  उपहारगृह, बारमध्ये विहित शारिरीक अंतराचे पालन होईल यानुसारच आसन व्यवस्था सुरू करण्यात यावी.  सातारा जिल्हयातील सर्व उपहारगृहे व भोजनगृहे सर्व दिवस रात्री 12.00 वा पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. 

   दुकाने :

सातारा जिल्हयातील सर्व व्यापारी दुकाने सर्व दिवस रात्री 10.00 वा. पर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. दुकानात काम करणाऱ्या सर्व व्यवस्थापन व कर्मचाऱ्यांचे कोविंड प्रतिबंधात्मक लसीकरणाचे दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा झाल्यानंतर 14 दिवसाचा कालावधी पूर्ण होणे आवश्यक राहिल. 

  शॉपिंग मॉल्स 

सातारा जिल्ह्यातील सर्व शॉपिंग मॉल्स सर्व दिवस रात्री 10 वा. पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. तथापि, शॉपिंग मॉलमध्ये काम करणाऱ्या सर्व व्यवस्थापन व कर्मचारी आणि प्रवेश करणाऱ्या सर्व नागरिकांचेही कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा झाल्यानंतर 14 दिवसाचा कालावधी पूर्ण होणे आवश्यक राहील. व तसे लसीकरण प्रमाणपत्र व त्यासमवेत फोटोसहित ओळखपत्र प्रवेशद्वारावर दाखविणे आवश्यक राहील.

 वय वर्ष 18 खालील वयोगटातील मुलांचे लसीकरण अदयाप सुरु न झाल्याने वय वर्षे 18 खालील वयागटातील मुला-मुलींना मॉल मध्ये प्रवेश करताना वयाचा पुरवा म्हणून आधारकार्ड, आयकर विभागाने निर्गमित केलेले पॅनकार्ड किंवा वयाचा उल्लेख असलेले शाळा किंवा महाविदयालयाचे वैध ओळखपत्र प्रवेशव्दारावर दाखविणे आवश्यक राहील. 

  जिम्नॅशिअम, योगसेंटर, सलून स्पा: 

वातानुकुलित तसेच विनावातानुकूलित 
जिम्नॅशिअम, योगसेंटर, सलून स्पा 50 टक्के क्षमतेने सर्व दिवस रात्री 10.00 वा. पर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. तथापि, उक्त संस्था वातानुकूलीत असल्यास, वायुविजनासाठी फॅन व वातानुकूलनासह खिडकी अथवा दरवाजा उघडा ठेवणे आवश्यक राहील. 

  *इनडोअर स्पोर्टस :* इनडोअर स्पोटर्स 

असलेल्या ठिकाणी खेळाडूंचे व तेथील कर्मचारी व व्यवस्थापन यांच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा झाल्यानंतर 14 दिवस झालेले असणे आवश्यक राहील. तसेच या ठिकाणी हवा खेळती राहण्यासाठी योग्य वायुविजन व्यवस्था असणे आवश्यक राहील. या ठिकाणी खेळाडूना बॅडमिंटन, टेबलटेनिस, स्क्वॅश, पॅरलल बार, मलखांब अशाच खेळांसाठी केवळ दोन खेळाडू या मर्यादेत सुरु करण्याची मुभा देण्यात येत आहे. 

  *कार्यालय / औद्योगिक / सेवाविषयक 

आस्थापना :* सर्व शासकीय- निमशासकीय आस्थापनांचे कर्मचारी, बँक कर्मचारी, रेल्वे व म्युनिसिपल कर्मचारी व व्यवस्थापन यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण प्राथम्याने पुर्ण करण्यात यावे.  ज्या खाजगी व औद्योगिक आस्थापनांच्या कर्मचा-यांचे व व्यवस्थापनांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पुर्ण झालेले असेल त्या आस्थापना पुर्ण क्षमतेने सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. सर्व आस्थापनांनी गर्दी टाळण्यासाठी शक्यतो विविध सत्रात कर्मचाऱ्यांना बोलावून कामाचे व्यवस्थापन करावे ज्या आस्थापना वरील कर्मचाऱ्यांना घरून काम करणे शक्य आहे अशा सर्व आस्थापनांच्या व्यवस्थापनांनी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा द्यावी . कार्यालयात काम करणे आवश्यक असल्यास कर्मचा-यांचा गर्दीच्या वेळी प्रवास टाळणे शक्य होईल अशा प्रकारे कार्यालयीन वेळेचे व्यवस्थापन करण्यात यावे.  शासकीय - निमशासकीय कार्यालये नियमित वेळेत पुर्ण क्षमतेने चालू ठेवणेस परवानगी असेल. तसेच खाजगी कार्यालयाना वेळेचे व्यवस्थापन करण्यासाठी कार्यालये 24 तास सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. मात्र अशा सत्र व्यवस्थापनांतर्गत कार्यालयांना एका सत्रात कार्यालयातील एकूण कर्मचारी संख्येच्या 25 टक्के उपस्थिती मर्यादित करणे आवश्यक राहील. 

सातारा जिल्हयातील सर्व मैदाने, उद्याने स्थानिक प्राधिकरणाने विहित केल्यानुसार त्यांच्या नियमित वेळेत सुरु राहतील. 

  *विवाह सोहळे :* 

विवाह सोहळा आयोजन करणेकामी संबंधित तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांची परवानगी घेणे बंधनकारक राहील.  खुल्या प्रांगणातील, लॉन वरील किंवा बंदिस्त मंगल कार्यालयातील विवाह सोहळे संबंधित प्रांगण, लॉन, मंगल कार्यालय, हॉटेल मधील आसन व्यवस्थेच्या 50 टक्के क्षमतेने व कोविंड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे संपर्ण पालन होईल या अटीवर मंगल कार्यालयाच्या प्रयोजनार्थ सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे.  खुल्या प्रांगण, लॉन मध्ये होणाऱ्या विवाह सोहळ्यास उपस्थितांची संख्या प्रांगण किंवा लॉन क्षमतेच्या 50 टक्के परंतु जास्तीत जास्त 200 व्यक्ती या मर्यादेत असेल.  बंदिस्त मंगल कार्यालय, हॉटेलमध्ये उपस्थितांची संख्या क्षमतेच्या 50 टक्के परंतु जास्तीत जास्त 100 व्यक्ती या मर्यादित असेल.  मात्र कोणत्याही परिस्थीतीत कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन केले जात आहे याची खातरजमा करण्यासाठी व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे व आवश्यकतेनुसार सक्षम प्राधिका-याला तपासणीसाठी उपलब्ध करून देणे आवश्यक राहील. या निर्बंधाचे उल्लंघन करणाऱ्यांवर तसेच संबंधित हॉटेल, कार्यालयांवर दंडनीय कारवाई तसेच संबंधित हॉटेल, मंगल कार्यालयाचा परवाना रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल. तसेच मंगल कार्यालय, हॉटेल,  लॉन व्यवस्थापन, भोजन व्यवस्थापन , बँडपथक, भटजी, फोटोग्राफर्स अशा विवाह व्यवस्थेशी संबंधीत सर्व संलग्न संस्था यामधील व्यवस्थापक व कर्मचारी यांचेही कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पुर्ण होऊन दुसरी मात्रा घेतल्यानंतर 14 दिवस पूर्ण होणे अनिवार्य राहील व त्यानुसार ओळखपत्रासह लसीकरण प्रमाणपत्र सोबत असणे आवश्यक राहील. तसेच या कार्यालयाच्या  दि.20/10/2021 आदेशाअन्वये दिलेल्या अटी व शर्तीनुसार सातारा जिल्हयातील बंदिस्त सभागृहे व मोकळया जागेमध्ये होणारे इतर सांस्कृतिक कार्यक्रम चालु ठेवणेस परवानगी असेल.

  *सिनेमागृहे , मल्टिप्लेक्स व नाटयगृहे :*

 या कार्यालयाच्या  दि.20/10/2021 व आदेशाअन्वये दिलेल्या अटी व शर्ती पालन करण्याच्या अटीनुसार सातारा जिल्हयातील सिनेमागृहे, मल्टिप्लेक्स व नाटयगृहे चालु ठेवणेस परवानगी असेल.

  *धार्मिक स्थळे :* 

 या कार्यालयाच्या   दि. 30/09/2021 मधील अटी व शर्तीचे पालन करण्याच्या अटीनुसार सातारा जिल्हयात धार्मिक स्थळे व प्रार्थना स्थळे चालू ठेवणेस परवानगी असेल. 

  *आंतरराज्य प्रवास :*

 ज्या नागरिकांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झाले आहे त्या नागरिकांना, बाहेरच्या राज्यातून सातारा जिल्हयात प्रवेश करण्यासाठी आरटीपीसीआर चाचणीची आवश्यकता नसेल. अन्य प्रवाशांसाठी ७२ तास पूर्वीची आरटीपीसीआर चाचणी निगेटीव्ह किंवा १४ दिवस विलगीकरण आवश्यक राहिल.   

  कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून गर्दी व्यवस्थापन करण्याबाबत केंद्र शासनाने तसेच मा. सर्वोच्च न्यायालयाने निर्देशित केले आहे. यास्तव गर्दी, जमाव टाळण्यासाठी वाढदिवस, राजकीय, धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम, निवडणूक प्रचार सभा, रॅली, मोर्चे, क्रिडा स्पर्धा इ. वरील निर्बंध कायम राहतील.   

  सातारा जिल्हयातील सर्व नागरिकांना कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना जसे की, मास्कचा वापर, हातांची स्वच्छता, शारिरीक अंतराचे पालन, इतरत्र थुंकण्यास प्रतिबंध, इ. सर्व निर्बंधांचे पालन करणे अनिवार्य राहिल.   

सर्व दुकाने, कार्यालये, औद्योगिक आस्थापना, उपहारगृहे, बार व मॉल मालक,  व्यवस्थापनाने त्यांचे आस्थापनेवर कार्यरत असलेल्या व्यवस्थापक तसेच कर्मचाऱ्यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचे दोन मात्रा पुर्ण होऊन 14 दिवस झाल्याची खातरजमा करावी व या कर्मचाऱ्यांची यादी (लसीकरण माहिती , प्रमाणपत्रासह) तयार ठेवावी व सक्षम प्राधिकाऱ्यांनी तपासणीसाठी मागणी केल्यास त्यांना उपलब्ध करुन दयावी. 

  दुकाने, उपहारगृहे, बार, मॉल्सचे, कार्यालये,औद्योगिक यांचे नियतकालीक निर्जतूकीकरण व सॅनीटायझेशन करण्याची जबाबदारी संबंधीत मालकाची व व्यवस्थापनाची असेल. तसेच, यामध्ये कर्मचारी तसेच ग्राहकांचे तापमान घेण्यासाठी इन्फ्रारेड, कॉन्टॅक्टलेस थर्मामिटर याची व्यवस्था करण्यात यावी, तसेच यामध्ये मास्क डिस्पेंसर व बायोमेडीकल वेस्ट (वापरलेले मास्क व टिशु पेपर्स इत्यादीची विल्हेवाट) जमा करण्याची व विहित कार्यपध्दतीने विल्हेवाटीसाठी देण्याची जबाबदारी संबंधीत आस्थापनांची असेल. 

  *अंत्यविधी व दशक्रिया विधी -

जास्तीत जास्त 50 नातेवाईक/नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यविधी व दशक्रिया विधी करणेस परवानगी असेल.
 9
  *जलतरण तलाव -*

 सातारा जिल्हयात कोविड -19 अनुषंगाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाचे पालन करणेचे अटीवर जलतरण तलाव सुरु करणेस परवानगी देणेत येत आहे.

  *ग्रंथालय :* 

या कार्यालयाच्या  दि.28/10/2021 अन्वये दिलेल्या अटी व शर्तीनुसार सातारा जिल्हयातील ग्रंथालय चालु ठेवणेस परवानगी असेल. 

CONTAINMENT ZONE बाबत संबंधित INCIDENT COMMANDER तथा उपविभागीय अधिकारी हे ज्या ज्या वेळी स्वतंत्र आदेश काढून CONTAINMENT ZONE जाहीर करतील व सदर क्षेत्रामध्ये जे निर्बंध लागू करतील ते आदेश CONTAINMENT ZONE क्षेत्रास लागू राहतील. 

या आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधीतांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीतांचे विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60, व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार तसेच भारतीय साथरोग अधिनियम 1897 अन्वये दंडनीय / कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 
  *0000*

No comments:

Post a Comment