Tuesday, November 9, 2021

उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही संप सुरु ठेवणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा ; 14 कर्मचाऱ्यांचे निलंबन....

वेध माझा ऑनलाइन
मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राज्य सरकारने जीआर  काढूनही संप सुरु ठेवल्याने न्यायालयाने संपकऱ्यांवर जोरदार ताशेरे ओढले आहेत. दरम्यान, एसटी संपावरुन पहिली कारवाई करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात संपकरी एसटी कामगारांवर प्रशासनाने कारवाई केली आहे. १४ संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचं प्रशासनाने निलंबन केलं आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा आगार, चंद्रपूर आगार आणि विभागीय कार्यशाळा या ३ घटकातील १४ कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. दिवाळीआधी राज्यात झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपानंतर चंद्रपूर जिल्ह्यातूनच अनिश्चितकालीन संपाला सुरुवात झाली होती. एसटी कर्मचाऱ्यांवर झालेल्या कारवाईच्या घटनेने कर्मचाऱ्यांमध्ये संताप पसरला आहे. आयुष्यभर शिस्तीत सेवा केल्याचं फळ सरकारने दिल्याची भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाची धार कमी करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलल्याचा आरोप एसटी कर्मचाऱ्यांनी केला आहे.  
दरम्यान,  न्यायालयाच्या आदेशांचा अवमान करून संप सुरूच ठेवणाऱ्या संघटना आणि कर्मचाऱ्यांविरोधात एसटी महामंडळाला अवमान याचिका दाखल करण्याची सूचनाही न्यायालयाने केली. त्याचवेळी परिवहन मंत्री अनिल परब यांनीही संपकऱ्यांना इशारा दिला आहे. न्यायालयाचा अवमान करु नका. अन्यथा याचिका दाखल होऊ शकते, असे ते म्हणाले.
एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासनात विलीनीकरण करावे आणि शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन द्यावे, या मागण्यांसाठी गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर सोमवारीही तोडगा निघाला नाही.

No comments:

Post a Comment