पाटण कॉलनीतील झोपडपट्टीवासीयांच्या प्रश्नांकडे तब्बल ५० वर्षे ढुंकूनही न पाहणाऱ्यांनी आज दीड वर्षाच्या कामाचा हिशोब मागणे हास्यास्पद आहे. शहरातील ज्या प्रश्नांकडे तुम्ही अथवा तुमच्या नेत्यांनी सातत्याने डोळेझाक केली, ते प्रश्न सोडविण्यासाठी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले सातत्याने प्रयत्न करत आहेत. अशावेळी त्यांच्यावर टीका करण्यापूर्वी विरोधकांनी स्वतःची उंची तपासावी, असा जोरदार टोला कराड नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते विजय वाटेगावकर यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील यांना लगावला आहे.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील यांनी पाटण कॉलनी झोपडपट्टी प्रश्नाबाबतचे निवेदन वर्तमानपत्रांना प्रसिद्धीस दिले आहे. या निवेदनात घेतलेल्या आक्षेपांवर सडेतोड प्रत्युत्तर देणारे निवेदन कराड नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते विजय वाटेगावकर यांनी प्रसिद्धीस दिले आहे. या निवेदनात श्री. वाटेगावकर यांनी म्हटले आहे, की नामदेव पाटील यांचे कराड शहराच्या विकासासाठी नेमके योगदान काय? शहरातील नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी त्यांनी किती वेळा आवाज उठवला? किती प्रश्न मार्गी लावले? याचे उत्तर आधी त्यांनी जनतेला द्यावे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या घरालगत असलेल्या पाटण कॉलनी झोपडपट्टी परिसरातील नागरिकांना कायमस्वरूपी हक्काचा निवारा मिळावा, यासाठी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले निवडून आलेल्या पहिल्या दिवसापासून प्रयत्नशील आहेत. या प्रश्नावर अगदी विधानसभेत आवाज उठवून, या प्रश्नाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. याशिवाय या प्रश्नातील कायदेशीर गुंतागुंत लक्षात घेऊन, त्यातून मार्ग काढण्यासाठी शासनस्तरावर प्रत्येक टप्प्यावर पत्रव्यवहार करुन, हा प्रश्न सोडविण्याच्या दिशेने सकारात्मक वाटचाल केली आहे.
आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी निवडून आल्यानंतर तातडीने ११ डिसेंबर २०२४ रोजी पाटण कॉलनीतील जागेचा वापर बदलून बेघरांसाठी घरे उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने संबंधित प्रशासकीय यंत्रणेकडे पत्र दिले. १६ डिसेंबर २०२४ रोजी कराड नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे तसा प्रस्तावही पाठवला. तसेच नगररचना योजना क्रमांक १ मधील संबंधित जागेवरील ‘पार्किंग’चे नामाभिधान बदलून, ‘बेघरांसाठी घरे’ करण्यासाठी महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियमातील तरतुदींनुसार परवानगी मागण्यात आली.
दरम्यान, १८ डिसेंबर २०२४ रोजी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी पाटण कॉलनीचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर करत उच्चस्तरीय हस्तक्षेपाची मागणी केली. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशामुळे व आ.डॉ. भोसले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अवघ्या ५ महिन्यात म्हणजेच दि. ८ एप्रिल २०२५ रोजी नगररचना विभागाच्या संचालक स्तरावर या प्रकरणाचा पुढील पत्रव्यवहार आणि प्रशासकीय पाठपुरावा सुरू झाला.
पुढे दिनांक ५ मे २०२६ रोजी महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने कराड नगरपरिषदेला याप्रकरणी पुढील कार्यवाहीबाबत स्पष्ट निर्देश दिले. संबंधित जागेचे स्थान, सद्यस्थिती, उपलब्ध सुविधा, पार्किंगची आवश्यकता आणि इतर बाबींचा विचार करून ‘पार्किंग’चे नामाभिधान बदलून, ‘बेघरांसाठी घरे’ करण्यासंबंधी योग्य निर्णय घेऊन, ‘महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम, १९६६’च्या कलम ३७ अन्वये प्रस्ताव सादर केल्यास शासनस्तरावर गुणवत्तेनुसार निर्णय घेतला जाईल, असे शासनाने स्पष्ट केले आहे.
या सर्व घडामोडी पाहता पूर्णपणे स्पष्ट होते, की पाटण कॉलनीतील झोपडपट्टीवासियांचा प्रश्न सोडविण्याच्या दिशेने आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी ठोस प्रशासकीय प्रक्रिया सुरू केली आहे. असे असताना नामदेव पाटील मात्र प्रसिद्धीच्या हव्यासापायी व स्वत:च्या नेत्यांची निष्क्रीयता लपविण्यासाठी आमदारांकडेच कामाचा हिशोब मागत आहेत, हे हास्यास्पद आहे.
खरंतर आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी या प्रश्नासाठी गेल्या दीड वर्षात केलेले प्रयत्न तारखेनिशी या निवेदनात आम्ही मांडले आहे. नामदेव पाटील यांनी हिम्मत असेल तर त्यांनी अथवा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पाटण कॉलनीतील नागरिकांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी गेल्या ५० वर्षांत काय प्रयत्न केले? या प्रश्नावर यापूर्वी किती पत्रे दिली? किती वेळा मंत्रालयात पाठपुरावा केला? किती प्रस्ताव शासनाकडे पाठवले? कोणते निर्णय घेतले? याचा हिशोब त्यांनीच जनतेसमोर द्यावा, असे आव्हान श्री. वाटेगावकर यांनी दिले आहे.
आ.डॉ. अतुलबाबांचा प्रत्यक्ष पाठपुरावा!
- १० डिसेंबर २०२४ : कराड नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र देऊन आरक्षण क्र. ४८ मधील पार्किंगचे नामांतर करून बेघरांसाठी घरे करण्याची प्रक्रिया सुरू करण्याची मागणी
- १६ डिसेंबर २०२४ : नगरपरिषदेने नगरविकास विभागाकडे प्रस्ताव पाठवून आरक्षण बदलास शासनाची परवानगी मागितली.
- १८ डिसेंबर २०२४ : आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदन सादर करून उच्चस्तरावर पाठपुरावा केला.
- ८ एप्रिल २०२५ : नगररचना संचालक स्तरावर पुढील पत्रव्यवहार व प्रशासकीय पाठपुरावा सुरू
- ५ मे २०२६ : राज्य नगरविकास विभागाने कराड नगरपरिषदेला याप्रकरणी पुढील कार्यवाहीबाबत स्पष्ट निर्देश दिले
‘उलटा चोर कोतवाला को डाटे’
ज्या भागात राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषविलेले माजी आमदार पृथ्वीराज चव्हाण राहतात, त्याच पाटण कॉलनीतील झोपडपट्टीवासीयांचा प्रश्न ५० वर्षांत त्यांना सोडविता आलेला नाही. अशावेळी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले हा प्रश्न सोडविण्यासाठी शासनस्तरावर योग्य व सकारात्मक पाठपुरावा करत असताना, त्यांनाच या कामाचा हिशोब मागण्याची काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील यांनी कृती म्हणजे ‘उलटा चोर कोतवाल को दाटे’, अशीच असल्याची टीका विजय वाटेगावकर यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment