Thursday, February 11, 2021

मराठा आरक्षणाबाबत उदयनराजे भोसलेंचा शरद पवारांनाच थेट इशारा...काय म्हणाले राजे...?

कराड
 खुद्द शरद पवार यांनीच मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी लक्ष घातले पाहिजे अन्यथा राज्यात मोठा उद्रेक होईल असा गंभीर इशारा खा उदयनराजे भोसले यांनी दिला आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात उदयनराजे भोसले यांनी गुरुवारी दिल्लीतील शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षणाच्या खटल्यात राज्य सरकारचे वकील व्यवस्थितपणे बाजू मांडताना दिसत नाहीत. त्यामुळे आता शरद पवार यांनी या सगळ्यात वैयक्तिकरित्या लक्ष घालून राज्य सरकारला सूचना दिल्या पाहिजेत. महाविकासआघाडी ही शरद पवार यांच्यामुळेच सत्तेत आहे. या सगळ्याची बांधणी त्यांनीच केली. त्यामुळे राज्य सरकारला सांगून मराठा आरक्षणावर तोडगा काढणे, हेदेखील शरद पवार यांचेच काम आहे, असे उदयनराजे भोसले यांनी म्हटले. ”मी पवारसाहेबांना सांगितलं आपल्याकडून काही मार्गदर्शन महाराष्ट्र सरकारला दिलं पाहिजे. राज्यातील सरकार पवारसाहेबांमुळे. त्याची बांधणी पवारसाहेबांनीच केली. त्यामुळे पवारसाहेबांनीच मराठा आरक्षणावर मार्ग काढायला हवा,” असे उदयनराजे भोसले यांनी सांगितले.
मराठा आरक्षणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार का? या प्रश्नावर उदयनराजे भोसले यांनी म्हटले की, “हा प्रश्न राजकीय नाही, हा राजकीय मुद्दा नाही. राजकारण कुणी आणू नये. हा विशिष्ट समाजाचा प्रश्न आहे. या समाजासाठी सत्तेत जे आहेत महाराष्ट्रात, पाहिलं तर मराठा समाजाचे सर्वाधिक आमदार आहेत. महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टात बाजू मांडायला हवी, ती होताना दिसत नाही.
सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकार मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यात कमी पडताना दिसत आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरुन दिशाभूल करु नये. मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नसेल तर तसे सांगावे. अन्यथा एक श्वेतपत्रिका काढावी. जेणेकरून मराठा आरक्षणासाठी लोकप्रतिनिधी काय करतात, हे जनतेला समजेल, असे उदयनराजे भोसले यांनी म्हटले 
आरक्षण द्यायचं नसल्यास तसं स्पष्ट सांगून त्याबाबतची श्वेतपत्रिका काढा, असं म्हणत हे पाऊल न उचलल्यास मराठा समाजाचा उद्रेक होईल असंही ते म्हणाले. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमिवर राज्य शासनानं शिवजयंती उत्सव साजरी करण्यावर काही निर्बंध घालण्यात आल्याबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली. शिवजयंती राज्याची अस्मिता असली तरीही या कोरोनाच्या काळात उत्सव साजरा करताना संसर्गाचा धोका संभवतो त्यामुळं उदयनराजेंनी शिवजयंती साठी सरकारने घालून दिलेल्या नियमांचे समर्थन केलं.

No comments:

Post a Comment