Wednesday, February 24, 2021

एक मार्च पासून सर्वसामान्यांना मिळणार कोरोनाची लस...या लोकांना मिळणार प्राधान्य...

नवी दिल्ली - देशात कोरोना विषाणू पुन्हा डोके वर काढत असतानाच कोरोनावरील लसीकरणाबाबत केंद्र सरकारने  मोठा निर्णय घेतला आहे. देशभरातील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे लसीकरण  मोठ्या प्रमाणावर पूर्ण झाल्यानंतर आता केंद्र सरकारने येत्या १ मार्चपासून देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी कोरोनावरील लसीकरण सुरू करण्याची घोषणा केली आहे. याबाबतची घोषणा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली आहे.

कोरोनावरील लसीकरणाची घोषणा करताना प्रकाश जावडेकर यांनी सांगितले की, येत्या १ मार्चपासून देशातील ६० वर्षांवरील नागरिकांना आणि गंभीर समस्यांनी ग्रस्त असलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांना कोरोनावरील लस दिली जाणार आहे
देशभरातील १० हजार सरकारी आणि २० हजार खासगी केंद्रांमधून हे लसीकरण केले जाईल. दरम्यान, सरकारी केंद्रावरील लसीकरण हे पूर्णपणे मोफत असेल, अशी माहितीही प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे.
गेल्या वर्षभरापासून देशभरात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना विषाणूचा फैलाव गेल्या काही महिन्यात कमी झाला होता. मात्र फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून देशातील काही राज्यांत कोरोना पुन्हा एकदा डोके वर काढताना दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांसाठी लसीकरण सुरू होणे हे दिलासा देणारे आहे.
कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या लसींना मान्यता देण्यात आल्यानंतर भारतामध्ये १६ जानेवारीपासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना कोरोनावरील लस देण्यास सुरुवात करण्यात आली होती. यामध्ये डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस तसेच इतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

No comments:

Post a Comment