Friday, December 22, 2023

सांगलीत नवरा, बायकोला कोरोनाची लागण; यंत्रणा अलर्ट ;

वेध माझा ऑनलाइन। सांगली जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना रूग्ण आढळले असून, शहरातील विश्रामबाग परिसरात दोघांना कोरोनाचे निदान झाले आहे. कोरोनाच्या नवीन व्हेरीयंटबाबत चर्चा सुरू असतानाच सांगलीतही रूग्ण आढळल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. शहरातील पती-पत्नीचा चाचणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर १४ जणांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने बैठक घेत उपचाराबाबत नियोजन केले आहे.

देशात कोरोनाचे रूग्ण आढळत असल्याने चिंता व्यक्त केली हाेती. राज्यातीलही काही भागात कोरोना रूग्ण आढळत होते. त्यानुसार महापालिका क्षेत्रात गुरूवारपासून चाचणी सुरू करण्यात आली. यात दोघे कोरोनाबाधित आढळले. सर्दी, ताप असल्याने त्यांची चाचणी घेण्यात आली. त्यांची प्रकृती चांगली आहे. रूग्णाच्या पत्नीची चाचणीही पॉझिटिव्ह आली असलीतरी कोणतीही लक्षणे नाहीत. दोन महिन्यांपूर्वी महापालिका क्षेत्रात कोरोना रूग्ण आढळला होता.

सांगलीत आढळलेल्या दोन रूग्णांना कोणत्या व्हेरीयंटचा कोरोना आहे याच्या तपासणीसाठी त्यांचे नमुने पुण्याला पाठविण्यात येणार आहेत.
दरम्यान, गुरूवारी जिल्हा प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. दुपारी मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या ऑनलाईन बैठकीतही याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी दिली आहे."

No comments:

Post a Comment