वेध माझा ऑनलाइन। काही दिवसांपूर्वी तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील पुरातन आणि मौल्यवान सोन्या-चांदीच्या दागिन्यांची चोरी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. त्यानंतर आता पंढरपूरच्या महाराष्ट्रातील जागृत अशा विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात असाच काहीसा प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक अॅड. सुनील घनवट यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या कारभारावर धक्कादायक आरोप केले आहेत. एसआयटी नेमून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या कारभाराची चौकशी करा, अशी मागणी सुनील घनवट यांनी केली आहे. श्री विठ्ठलाचे 203 आणि रुक्मिणी मातेच्या 111 दागिन्यांची नोंद ताळेबंदामध्ये दिसून येत नसल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी महाराष्ट्र मंदिर महासंघ आक्रमक झालं आहे.
संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी मंदिर महासंघाने केली आहे. लेखापरीक्षकांना रजिस्टर दाखवले नाही तर लेखा परीक्षण का केले? असा सवाल करण्यात आला आहे. आम्हाला 315 दागिने दिले नाहीत असं लेखापरीक्षकांचा अभिप्राय आहे. दागिने सील करून ठेवले जात नाहीत. दागिने सील न केल्याने दागिने गायब करण्याला किंवा बदलण्याला वाव मिळतो. देणगी मोजताना बाहेर सुरक्षा रक्षक नेमला नाही, असा आरोप महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक सुनील घनवट यांनी केला आहे.“शौचालय बांधण्यासाठी रेल्वेची जागा भाड्याने घेतली आणि 22 लाख 6 हजार 575 रुपये दिले. पण शौचालय बांधले नाही. सरकारने 2016 पासून नियुक्त अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी करावी. समिती बरखास्त करा आणि अधिकाऱ्यांना बडतर्फ करा”, अशी मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघाने केली आहे.
No comments:
Post a Comment