वेध माझा ऑनलाइन। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कर्जत येथील शिबिरात आज बोलताना अजित पवारांनी शरद पवारांवर अनेक आरोप केले. तसेच शरद पवार समर्थक नेत्यांनाही त्यांनी सोडले नाही. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अजित पवारांनी आजच्या भाषणात आमदार रोहित पवार यांनाही सोडले नाही. विशेष म्हणजे काका असलेल्या अजित पवारांवर टीका करणे पुतण्या रोहित पवार यांनी नेहमीच टाळले आहे. मात्र, आज काकांनीच टीकेचा पहिला वार केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची सध्या संघर्ष यात्रा सुरू आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर पुण्याहून निघालेली ही युवा संघर्ष यात्रा १२ डिसेंबरला नागपूरला पोहचणार आहे. या यात्रेवर टीका करताना अजित पवार म्हणाले, काहीजण आता गुडघ्याला बाशिंग बांधून संघर्ष यात्रा काढत आहेत. अरे कसला संघर्ष? कधी आयुष्यात संघर्ष केला नाही आणि आता कशाचा संघर्ष?
तर शरद पवार समर्थक आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका करताना अजित पवार म्हणाले, मागे एकदा आमचे वरिष्ठ पावसात भिजले होते, तसे आता त्यांचा एक सहकारीही पावसात भिजला. अरे कशासाठी? त्याच्यावर एकदा हल्ला झाला होता, तेव्हा मीच आधार द्यायला गेलो होतो. मी सगळ्यांच्या पाठीशी उभा राहिलो.
कारण आपल्यात तशी हिंमत आहे.
आगामी निवडणुकांबद्दल अजित पवार म्हणाले, यापुढे मी आठवड्याच्या सात दिवसांपैकी तीन दिवस मुंबईला, एक दिवस पुण्याला आणि उर्वरित तीन दिवस महाराष्ट्रभर फिरणार आहे. पक्षवाढीसाठी मलाही जास्त काम करावे लागेल.
तसेच प्रदेशाध्यक्ष, सगळ्या सेलचे प्रमुख आणि मंत्र्यांनाही काम करावे लागेल. सर्वसामान्य माणसांच्या अडचणी सोडवाव्या लागतील.
नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना आवाहन करताना अजित पवार म्हणाले, मागे एक बातमी आली की,लोकसभेला भाजप २६ जागा लढवणार आहेत. पण तुम्ही काळजी करू नका. जी काही ताकद आहे, त्यानुसार व्यवस्थित जागा मिळतील. सर्व कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका आहे. पक्ष मजबूत करण्यासाठी शिदोरी
घेऊन आपआपल्या भागात काम करण्यासाठी जाऊया.
No comments:
Post a Comment