Friday, December 8, 2023

एकनाथ शिंदेंचं नवाब मलिकांबाबत मोठं विधान : अजित दादांची झाली कोंडी ! काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?

वेध माझा ऑनलाइन। नवाब मलिकांना महायुतीत घेण्याला आमचा विरोध आहे, असे स्पष्टपणे देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना सांगितले. त्यामुळे अजित पवार गटाची कोंडी झाली आहे. त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची भूमिका मांडताना अजित पवारांना सल्ला दिला आहे. त्याचबरोबर मलिकांबद्दलची भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली आहे.

नवाब मलिक सत्ताधारी बाकावर बसल्याने महाराष्ट्रात नवा राजकीय मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. मलिक सत्ताधारी बाकावर बसल्याने ते अजित पवारांसोबत असल्याचा स्पष्ट संदेश राज्यात गेला. पण, त्यांच्या भूमिकेमुळे अजित पवार गट अडचणीत आला आल्याचे दिसत आहे. प्रकरण-देवेंद्र फडणवीसांचं पत्र
नवाब मलिकांबद्दल बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "माजी मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार नवाब मलिक यांच्यावरील आरोप हे गंभीर स्वरूपाचे आहेत. सध्या केवळ प्रकृतीच्या कारणावरून ते जामिनावर तुरुंगातून बाहेर आहेत. त्यांना कोर्टाने अद्याप निर्दोष ठरविलेले नाही. त्यामुळे त्यांच्याविषयीची आमची पूर्वीची भूमिका अजूनही कायम आहे."

मलिक सत्ताधारी बाकावर बसलेले होते. त्यावर शिंदे म्हणाले, "सत्ताधारी पक्षांच्या बाकावरील त्यांची उपस्थिती संकेतांना धरुन नाही", अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्री शिंदेंचा अजित पवारांना सल्ला...
"आघाडीच्या घटक पक्षांनी त्यांचा पक्ष कसा चालवावा हा सर्वस्वी त्या त्या पक्षाचा प्रश्न आहे. परंतु महायुतीमधील सर्व घटक पक्ष देशहित व जनहिताच्या ध्येयाने एकत्र आलेले आहेत. त्यामुळे काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या भूमिकेशी शिवसेना पूर्णतः सहमतच आहे. किंबहुना ही आम्ही परस्पर सहमतीनेच ती भूमिका घेतलेली आहे. जनहिताचा, लोकभावनेचा आदर करून अजितदादा पवार योग्य भूमिका घेतील", असे शिंदे या प्रकरणावर म्हणाले दरम्यान "विरोधी पक्षानेही या विषयावर नाकाने कांदे सोलायची काही गरज नाही. त्यांना तो अधिकार नाही. नवाब मालिक तुरुंगात असताना ते महाविकास आघाडीत मंत्रीपदावर होते. त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली गेली नव्हती. त्यामुळे त्यांना या मुद्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही", अशा शब्दात शिंदेंनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

No comments:

Post a Comment