Thursday, December 7, 2023

कराडची स्मशानभूमी येणार सीसीटीव्हीच्या कक्षेत : मुख्याधिकारी


वेध माझा ऑनलाइन। पर्यावरण प्रदूषण रोखण्यासाठी येथील वैपुंठ स्मशानभूमीत वैकुंठधाम स्मशानभूमी सुधार समितीने अग्निकाष्ठ अंत्यसंस्काराचा उपक्रम सुरू केला आहे. हा उपक्रमास नगरपालिका सर्वतोपरी सहकार्य करणार आहे. येत्या १ जानेवारीपासून अग्निकाष्ठ अंत्यसंस्काराचा खर्च नगरपालिका करणार असून शहरवासियांसाठी अग्निकाष्ठ अंत्यसंस्कार मोफत करण्यात येतील, अशी घोषणा नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी शंकर खंदारे यांनी केली.

येथील वैकुंठधाम स्मशानभूमी सुधार समितीने कराड नगर परिषदेच्या सहकार्याने स्मशानभूमीमध्ये सुशोभीकरण व सुधारणा केल्या आहेत. स्मशानभूमीत भगवान शंकरांच्या मूर्ती बसवण्यात आली आहे या मूर्तीचे लोकार्पण बुधवारी सायंकाळी मुख्याधिकारी शंकर खंदारे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली.  

स्मशानभूमी सुधार समितीचे अध्यक्ष विनायक पावसकर, सचिव सुधीर एकांडे, उपाध्यक्ष सागर बर्गे, खजिनदार कुमार शहा, सदस्य विनायक विभुते, सुरेश पटेल, अनिल दसवंत, नितीन शहा, माजी नगरसेविका विद्या पावसकर, नगरअभियंता रत्नरंजन गायकवाड, आरोग्य प्रमुख मिलिंद शिंदे, मुद्दस्सर नदाफ यांची उपस्थिती होती.

अग्निकाष्ठ अंत्यसंस्कार हे पर्यावरण समतोल राखणारे असल्याने लवकरच याबाबत समितीबरोबर बैठक घेऊन चर्चा केली जाईल. वर्षभरात अग्निकाष्ठ अंत्यसंस्काराची यादी समितीने नगरपालिकेस द्यावी. त्याचे पैसे नगरपालिकेतर्फे अदा केले जातील. यामुळे अग्निकाष्ठ अंत्यसंस्काराची शहरात मोफत सोय होईल, असे मुख्याधिकारी शंकर खंदारे यांनी यावेळी सांगितले.

विनायक पावसकर म्हणाले, अग्निकाष्ठ उपक्रम राबवताना सुरूवातीला अडचणी आल्या. मात्र आता नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. स्मशानभूमी सुधार समिती, नागरिक आणि नगरपालिकेच्या सहकार्यातून स्मशानभूमीचा विकास करण्यात येत आहे. आणखी काही विकासकामेही प्रस्तावित केली आहेत. नगरपालिकेच्या सहकार्याने ती पूर्ण करण्यात येतील.
मुख्याधिकारी शंकर खंदारे, रत्नरंजन गायकवाड, शंकराची मूर्ती देणारे प्रकाश जाधव, मिलिंद शिंदे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक सुधीर एकांडे यांनी केले.

स्मशानभूमी येणार सीसीटीव्हीच्या कक्षेत ..
मुख्याधिकारी शंकर खंदारे यांनी स्मशानभूमी विकासाबाबत यावेळी समिती सदस्यांबरोबर चर्चा केली. याठिकाणी सुरक्षा गरजेची असून  सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येतील, असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच राज्यात फार कमी ठिकाणी स्मशानभूमी सुधारणांची कामे झालेली आहेत. कराड शहर त्याबाबत अग्रेसर असून भविष्यातही सुधारणा केल्या जातील, असे त्यांनी सांगितले.


No comments:

Post a Comment