Monday, December 18, 2023

मुंढे प्रकल्पग्रस्तांनी डॉ. अतुल भोसलेंच्या पुढाकारातून नागपुरात घेतली उपमुख्यमंत्र्यांची भेट : प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस सकारात्मक

वेध माझा ऑनलाइन। कराड दक्षिणमधील मुंढे येथील महापारेषण प्रकल्पात बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांनी भारतीय जनता पार्टीचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांच्या पुढाकारातून नागपूर येथे राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच भेट घेतली. यावेळी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत उपमुख्यमंत्री ना. फडणवीस यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. 

मुंढे येथील महापारेषणच्या प्रकल्पात बाधित झालेल्या ३५ जणांना २०१६ साली नोकरीत घेण्यात आले. पण प्रशिक्षणार्थी म्हणून नोकरीस लागलेल्या या प्रकल्पग्रस्तांना गेली ७ वर्षे नोकरीत कायम करण्यात आलेले नाही. याप्रश्नी डॉ. अतुल भोसले यांनी पुढाकार घेऊन, शासनस्तरावर पाठपुरावा करावा, अशी आग्रही मागणी या प्रकल्पग्रस्तांनी काही दिवसांपूर्वी कराड येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीवेळी केली होती. त्यावेळी या प्रश्नाबाबत लवकरच उपमुख्यमंत्र्यांबरोबर प्रकल्पग्रस्तांची भेट घडवून आणण्याचे अभिवचन डॉ. भोसले यांनी दिले होते. 

त्यानुसार नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. अतुल भोसले यांच्या पुढाकारातून प्रकल्पग्रस्तांनी उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच भेट घेतली. या प्रकल्पात बाधित झालेल्या कुटुंबातील जे युवक नोकरीत आहेत, त्यांना कायम करावे यासह अन्य मागण्यांचे निवेदन ना. फडणवीस यांना देण्यात आले. 

यावेळी त्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत सकारात्मकता दर्शविली. तसेच याप्रश्नी २० डिसेंबरनंतर मुंबईत प्रकल्पग्रस्तांची संबंधित विभागातील अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेवून हा प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही दिली. यावेळी मुंढे गावचे उपसरपंच सागर पाटील, राहुल साळवी, राहुल जमाले, दत्ता माळी, अविनाश साळवी, प्रशांत सावंत उपस्थित होते.


No comments:

Post a Comment