Saturday, December 23, 2023

अहंकार माणसाचा शत्रू आहे, अहंकारापासून दूर रहा : लायन्स क्लब, रोटरी क्लब आणि सॅटर्डे क्लबच्या वतीने आयोजित व्याख्यानात चंद्रकांत निंबाळकर यांचे प्रतिपादन ; काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाइन। अहंकार हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. त्यामुळे माणसाने अहंकारापासून नेहमी दूर राहिले पाहिजे. समाजाचे हित जोपासत असताना माणसाची स्वतःची प्रगती होत असते. त्यामुळे माणसाने समाजिताला व राष्ट्रहिताला प्राधान्य दिले पाहिजे, असे प्रतिपादन जीवन विद्या मिशनचे प्रसिद्ध व्याख्याते चंद्रकांत निंबाळकर यांनी केले.

कराड येथे लायन्स क्लब, रोटरी क्लब व सॅटर्डे क्लबच्या वतीने आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी लायन्स क्लब ऑफ कराड मेनचे अध्यक्ष ला.खंडू इंगळे, रोटरी क्लब ऑफ कराडचे अध्यक्ष रो.बद्रीनाथ धस्के, सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.प्रविण माने यांच्यासह जीवन विद्या मिशन फौंडेशनचे अध्यक्ष दिलीप महाजन, जीवन विद्या मिशन कराडचे अध्यक्ष दीपक कदम आदी प्रमुख उपस्थित होते. 

यावेळी कराड शहर व परिसरातील सामाजिक संघटनांच्या सर्व अध्यक्षांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते जीवन विद्या मशीनचे सद्गुरु वामनराव पै यांचे पुस्तक भेट देऊन करण्यात आला.

यावेळी बोलताना चंद्रकांत निंबाळकर म्हणाले, माणसाने जीवन जगत असताना अंधश्रद्धेला खतपाणी घालू नये. उपासतपास करून लोकांचे कल्याण होत नाही. उपाशी लोकांना मदत करणे गरजेचे आहे. आणि हीच खरी समाज सेवा आहे. सद्गुरु वामनराव पै यांनी तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार असे सांगितले आहे. संतती हीच खरी माणसांची संपत्ती आहे. त्यामुळे त्या संततीला चांगल्या प्रकारे वाढले पाहिजे. तिच्यावर चांगले संस्कार करणे ही माणसांची खरी जबाबदारी आहे. समाजातील गोरगरीब लोकांना मदत व सहकार्य करण्याचे काम लायन्स, रोटरी व सॅटर्डे क्लबच्या माध्यमातून केले जात आहे. ही अतिशय समाधानाची व आनंदाची बाब आहे, असेही चंद्रकांत निंबाळकर यांनी सांगितले.यावेळी दिलीप महाजन,ला.खंडू इंगळे, डॉ.प्रवीण माने यांनी मनोगते व्यक्त केली.यावेळी कराड व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रास्ताविक बद्रीनाथ धस्के यांनी केले तर  सुत्रसंचालन प्रा.सुधीर पाटील यांनी केले  रमेश कांबळे यांनी आभार मानले.




No comments:

Post a Comment