Thursday, December 7, 2023

पाटण तालुका धनगर समाजाच्यावतीने दि. १० रोजी पाटण शहरातून निघणार मोर्चा ;

वेध माझा ऑनलाईन। धनगर आरक्षणासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी व मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पाटण तालुका धनगर समाजाच्यावतीने रविवार दि. १० रोजी सकाळी ११ वाजता पाटण शहरातील चाफोलीरोड ते झेंडाचौकामार्गे पाटण तहसील कार्यालयावर हजारोंच्या संख्येने भव्य व धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा पाटण तालुका सकल धनगर समाजाच्यावतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

निवेदनात म्हटले आहे,गेल्या ७४ वर्षापासून धनगर समाज अनुसूचित जमातीच्या आरक्षणापासून वंचित राहिला आहे.महाराष्ट्र शासनाने त्याची अंमलबजावणी न केल्याने तसेच शासनाने अनेकवेळा आश्वासने देवून धनगर समाजाची दिशाभूल केल्याने सकल धनगर समाज पाटण तालुक्याच्यावतीने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व आरक्षणाची अंमलबजावणी करून एसटीचे प्रमाणपत्र वितरीत करावे. 

महाराष्ट्रात गाई, म्हैशी,शेळ्या मेंढ्या पाळणाऱ्यांवर होणारा अन्याय दूर करावा. राज्य शासनाने एक हजार कोटींची तरतुदीची तातडीने अंमलबजावणी करावी. पाटण येथे शासनाने राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक उभारावे. या प्रमुख मागण्यांसाठी पाटण तालुका सकल धनगर समाजाच्यावतीने रविवार दि. १० रोजी सकाळी ११ वाजता चाफोलीरोड ते झेंडाचौक मार्गे पाटण तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.

याबाबतचे निवेदन तहसीलदार पाटण व उपविभागीय कार्यालय पाटण, पाटण पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment