Sunday, December 24, 2023

मंजूर आराखड्यानुसार उड्डाणपुलाचे काम न केल्यास आंदोलन‘- 2004 साली आराखड्यात बदल करणारांवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा ;सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पाटील यांच्यासह कराडकरांची मागणी;

वेध माझा ऑनलाईन।  कोल्हापूर नाका येथे आशियाई महामार्गावर बांधण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाचे मंजूर आराखद्यानुसारच काम करावे. येथील अपघात रोखण्यासाठी महामार्ग विभागाने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उड्डणपुलाचे डिझाईन तयार केले आहे. एक दोन व्यावसायिकांच्या स्वार्थासाठी त्यांच्या दबावाला बळी पडून पुलाच्या मंजूर आराखडयात बदल करू नये अन्यथा विविध संघटना व कराडकर नागरिकांच्या वतीने जशास तसे आंदोलन करण्याचा इशारा ‘दक्ष कराडकर'चे प्रमोद पाटील यांनी दिला आहे.  

कोल्हापूर नाका येथील उड्डाणपुलाला ऍप्रोच रस्ते व्हावेत, अशी मागणी करीत 10 जानेवारी रोजी काही व्यावसायिक व लोकप्रतिनिधींनी उड्डाण पुलाचे काम रोखण्याचा इशारा दिला आहे. या विरोधात शहरातील विविध संघटनांनी शनिवारी येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेत मंजूर आराखडय़ानुसारच काम करण्याची मागणी केली आहे. यावेळी प्रमोद पाटील, विश्व इंडियन पार्टीचे जिल्हाध्यक्ष बापू लांडगे, प्रमोद तोडकर, प्रताप इंगवले, जाबीर वायकर, विनायक भोसले, महेश जाधव यांच्यासह पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

प्रमोद पाटील म्हणाले, 2004 मध्ये पुणे-बेंगलोर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असताना काही व्यावसायिकांनी स्वत:च्या फायद्यासाठी कोल्हापूर नाक्यावरील उड्डाणपुलाच्या आराखडय़ात बदल केला. परिणामी एका लेनवर उड्डणपूल व दुसरी सामान्य लेन झाली. त्यामुळे उड्डाण पुलाच्या खाली शेकडो लहान मोठे अपघात झाले. आता येथे नवीन उड्डाणपूल बांधण्याचे काम सुरू झाले आहे. यासाठी पुणे-कोल्हापूर लेनवरील कोल्हापूर नाका येथील उड्डाणपूल व ढेबेवाडी फाटा येथील उड्डाणपूल पाडण्यात आला आहे. तर वारूंजी ते नांदलापूर दरम्यान सहापदरी उड्डणपूल बांधण्याचे काम सुरू झाले आहे. मात्र कोल्हापूर नाका येथील काही पेट्रोलपंपधारक व हॉटेल व्यावसायिक स्वत:च्या फायद्यासाठी उड्डाणपुलाच्या आराखडय़ात बदल करून कोल्हापूर नाका येथे शहरात येणाऱ्या ऍप्रोच रस्त्याची मागणी करीत दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. वास्तविक या ठिकाणी ऍप्रोच रस्ते केल्यास पुन्हा अपघातप्रवण क्षेत्र तयार होणार आहे. त्यामुळे महामार्ग प्रशासनाने कुठल्याही परिस्थितीत उड्डाणपुलाच्या मंजूर आराखड्यात बदल करू नये, अन्यथा पुलाच्या बांधकामाला विरोध करणारांच्या विरोधात त्याच दिवशी त्याच ठिकाणी विविध संघटना व कराडकर नागरिकांच्या वतीने जशास तसे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment