Sunday, January 5, 2025

आमदार डॉ. अतुल भोसले यांनी केली रेठरे बुद्रुक येथील नदीकाठाची पाहणी ; यावेळी आमदार भोसले काय म्हणाले?

वेध माझा ऑनलाइन।
रेठरे बुद्रुक गावाला सुंदर नदीचा काठ लाभला आहे. या नदीकाठाचे सुशोभीकरण करण्यासाठी सर्वसमावेशक विकास आराखडा सादर करण्याच्या सूचना, कराड दक्षिण विधानसभेचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी प्रशासनाला दिल्या. दरम्यान, य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्यासमवेत आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी रेठरे बुद्रुक येथील नदीकाठाची पाहणी केली. 

रेठरे बुद्रुक गावातील कृष्णा नदीचा काठ विकसित करण्याचा संकल्प आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केला आहे. या अनुषंगाने ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, अधिकारी व आर्किटेक्ट यांच्यासमवेत आ.डॉ. अतुलबाबा भोसले व डॉ. सुरेश भोसले यांनी नदीकाठ परिसराची पाहणी केली. 

यावेळी बोलताना डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, रेठरे बुद्रुक गावाला लाभलेला नदीचा काठ ही गावाला मिळालेली मोठी भाग्याची गोष्ट आहे. या भागाच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी, नदीकाठाचे सुशोभीकरण करणे आवश्यक आहे. यादृष्टीने प्रशासनाने नदीकाठ विकासाचा नवीन आराखडा तयार करावा. तसेच त्यामध्ये पूरसंरक्षक भिंतीसह या जागेवर खुले सभागृह, ऑडिटोरिअम, उद्यान, जेष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा पार्क, बालोद्यान, बोटींगची सुविध, फूड कोर्ट, भक्त निवास, लेजर शो व कारंजे यांचा समावेश असावा. तसेच याठिकाणी सौरऊर्जा प्रकल्प साकारल्यास, यासाठी आवश्यक विजेचा पुरवठा मोफत होऊ शकेल. रेठरे बुद्रुकचे नाव राज्यात नावारुपाला येईल, अशा प्रकारचे सुशोभीकरण या नदीकाठावर व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

नदीकाठचा परिसर सुशोभीत झाल्यामुळे इथल्या पर्यटन विकासाला चालना मिळेल. शिवाय यामुळे स्थानिक व्यवसायिकांनादेखील याचा लाभ होईल, असा विश्वास डॉ. सुरेश भोसले यांनी व्यक्त केला. 

यावेळी सरपंच हणमंत सूर्यवंशी, आर्किटेक तुषार पाटील, माजी पं. स. सदस्य संजय पवार, जयवंतराव साळुंखे, बापुराव मोहिते, प्रमोद मोहिते, सुहास घोडके, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ डोईफोडे, शरद धर्मे, सचिन जाधव, जितेंद्र साळुंखे, विक्रम साळुंखे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते

जिल्हा परिषदेची शाळा स्मार्ट बनविणार..

याप्रसंगी आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांनी रेठरे बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेला अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी शालेय कामकाजाचा आढावा घेत, शालेय इमारतीची व वर्गखोल्यांची पाहणी केली. शाळेच्या नूतन इमारतीसाठी आराखडा सादर करण्याच्या सूचना करत, शाळेत डिजीटल क्लासरुम, अत्याधुनिक ग्रंथालय व सुसज्ज पटांगण विकासित करण्यासाठी लागणाऱ्या निधीसाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

No comments:

Post a Comment