Friday, January 10, 2025

शरद पवार महाविकास आघाडीत नाराज ! काय आहे कारण ?

वेध माझा ऑनलाइन।
महाविकास आघाडी समन्वयाचा अभाव असल्याने शरद पवार नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. नुकत्याच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडल्यात. या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं अनपेक्षित बहुमत मिळवत आपली सत्ता कायम टिकवली आणि राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार स्थापन झालं. मात्र या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या पराभवावर चिंतन आणि मंथन करण्यासाठी महाविकास आघाडी नेत्यांची बैठक झाली नाही. यासह आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अर्थात महापालिका निवडणुकांबाबत महाविकास आघाडीतील तीनही पक्षांमध्ये अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. मुंबई पालिका निवडणूक ठाकरे गट स्वतंत्र लढण्याच्या तयारीत आहे, असं शरद पवार गटाचं मत आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये एकत्रित बैठक आणि चर्चा होत नसल्याने शरद पवार महाविकास आघाडीमध्ये नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तर महाविकास आघाडीची घडी पुन्हा बसली पाहिजे आणि महाविकास आघाडीमध्ये समन्वय वाढला पाहिजे, असं शरद पवार यांचं मत आहे. बैठकांसाठी शरद पवार आग्रही आहेत पण नेत्यांचा पुढाकार नसल्याने मविआमध्ये नाराज असल्याची माहिती समोर आली आहे.

No comments:

Post a Comment