Monday, December 16, 2024

भुजबळ राज्यपाल होणार? एका मोठ्या नेत्यांचा दावा;

वेध माझा ऑनलाइन।
नागपूरमध्ये राजभवन येथे रविवारी, 15 डिसेंबररोजी महायुती सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार पार पडला. यामध्ये महायुतीच्या 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी महायुतीत अनेक दिग्गज नेत्यांना मंत्रीमंडळात डच्चू देण्यात आला आहे. राष्ट्रवादीकडून ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना डावलण्यात आले आहे. यानंतर त्यांच्या नाराजीच्या चर्चेला उधाण आलंय.

भुजबळ यांना डावलण्यात आल्यानंतर त्यांचे समर्थक देखील प्रचंड संतापले आहेत.छगन भुजबळ यांनी देखील माध्यमांशी बोलताना उघडपणे नाराजी बोलून दाखवली आहे. मंत्रिपद कितीवेळा आलं आणि किती वेळा गेलं, तरी भुजबळ संपला नाही, असं म्हणत भुजबळ यांनी काल संताप व्यक्त केला होता.

छगन भुजबळ राज्यपाल बनणार?
छगन भुजबळ यांच्यासारख्या मोठ्या ओबीसी नेत्याला मंत्रिमंडळातून बाहेर का ठेवण्यात आले?, असा प्रश्न कालपासून केला जातोय. त्यातच भाजप आमदाराने केलेल्या एका दाव्याने राजकारणात खळबळ उडाली आहे. छगन भुजबळ यांची राज्यपालपदी नियुक्ती केली जाणार असल्याचा दावा भाजपा आमदाराने केलाय.

छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आलेला नाही. त्यांना राज्यपाल केले जाणार आहे, असा दावा भाजप आमदार आशिष देशमुख यांनी केलाय.तसंच मंत्रीपद मिळालं नाही म्हणून कुणीही नाराज झाले नाही, असंही आशिष देशमुख म्हणाले. आता देशमुख यांनी छगन भुजबळ यांच्याबाबत केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.


दरम्यान, काल माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचं नाव घेत मोठं वक्तव्य केलं होतं. मनोज जरांगे यांना अंगावर घेतलं, त्याचं बक्षीस मिळालं, असं संतापून भुजबळ म्हणाले होते. मी ओबीसीची लढाई लढलो. त्यामुळे सर्व ओबीसी एकत्र आले आणि महायुतीला मोठे यश मिळाले आहे. अर्थात त्यात लाडकी बहीणचा वाटा आहे. परंतु ओबीसींचा देखील पाठिंबा आहे, असंही भुजबळ म्हणाले होते.

No comments:

Post a Comment