Sunday, December 29, 2024

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड आज सरेंडर होणार?

वेध माझा ऑनलाइन
बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराडबाबत एक अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे. संतोष देशमुख यांची हत्या झाली तेव्हापासून वाल्मीक कराड फरार आहे. मात्र, आता मिळालेल्या माहितीनुसार, ते आज (30 डिसेंबर) कोणत्याही क्षणी पोलिसांसमोर सरेंडर होऊ शकतात, असं म्हटलं जातंय.

संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. हत्या प्रकरणी आतापर्यंत शंभरहून अधिक लोकांची चौकशी करण्यात आली आहे. हे प्रकरण आता थेट सीआयडीकडे गेले असून सीआयडीकडून तपास केला जातोय.अशात आज वाल्मिक कराड पोलिसांसमोर सरेंडर होणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, वाल्मिक कराडचे बँक खाते देखील गोठवण्यात आले आहे. त्याचबरोबर इतर आरोपींचीदेखील बँक खाते गोठवण्यात आली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर ही कारवाई झाली. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीने 9 पथकं तयार केली आहेत. यामध्ये 150 पेक्षा जास्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश असून याचा वेगवेगळ्या अॅंगलने तपास केला जातोय.

सीआयडीकडून नुकतीच वाल्मिक कराड यांच्या पत्नीची चौकशी करण्यात आली. तब्बल दोन तास ही चौकशी झाली. वाल्मिक कराड हे अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्या जवळचे मानले जातात. गेल्या दहा वर्षांपासून वाल्मिक कराड हे एनसीपीचे काम करत आहेत. परळीचे नगराध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले.अशात त्यांचे नाव संतोष देशमुख हत्या प्रकरणात आले आहे.

No comments:

Post a Comment