वेध माझा ऑनलाइन।
बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराडबाबत एक अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे. संतोष देशमुख यांची हत्या झाली तेव्हापासून वाल्मीक कराड फरार होता. जवळपास 20 ते 22 दिवसांनंतर वाल्मिक कराड हा स्वतःहून पोलिसांना शरण गेला आहे.
वाल्मिक कराड हा आता पुणे पोलिसांना आणि सीआयडीला शरण आला आहे. नुकतंच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शरण येण्यापूर्वी त्याचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. यात वाल्मिक कराडने आपल्याला राजकीय द्वेषापोटी गोवण्यात आल्याचा आरोप केलाय. संतोष देशमुख हत्या प्रकरणी माझा काही संबंध नाही, असं वाल्मिक कराडने म्हटलंय.
तर संतोष देशमुख यांच्या कन्या यांनी देखील यावर महत्वाची प्रतिक्रिया दिली. ‘वाल्मिक कराड स्वतः पोलिसांना शरण गेले तर मग इतक्या दिवस पोलीस काय करत होते?’, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केलाय. सध्या वाल्मिक कराड यांच्यावर फक्त खंडणीचा गुन्हा दाखल असून त्यांच्या अटकेनंतर आता पुढील तपास लवकरच केला जाईल.
दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले आणि विष्णू चाटे अशी या आरोपींची नावे आहेत. तर, मुख्य आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे तिघे फरार आहेत.
या प्रकरणी सीआयडीकडून आतापर्यंत शंभरहून अधिक लोकांची चौकशी करण्यात आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीने 9 पथकं तयार केली आहेत. यामध्ये 150 पेक्षा जास्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश असून याचा तपास केला जातोय.
संतोष देशमुख हत्या प्रकरण
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबररोजी अपहरण करण्यात आले होते. अपहरण करून नंतर त्यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. या हत्येनंतर बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी असल्याचा दावा केला जातोय.
No comments:
Post a Comment