Wednesday, December 25, 2024

नगरपालिका महानगरपालिकाच्या निवडणुका कधी होणार ?मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले.?

वेध माझा ऑनलाईन।
राज्यातील विधानसभांच्या निवडणुका संपन्न होऊन नवीन सरकार स्थापन झालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारचा मंत्रिंमडळ विस्तार होऊन पहिलं अधिवेशनही पार पडलं. त्यामुळे, लोकसभा, विधानसभा निवडणुकानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नेत्यांच्या निवडणुका झाल्या, आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका कधी होतील, असा प्रश्न सातत्याने उपस्थित होत आहे. कारण, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या असून गेल्या 2 ते अडीच वर्षांपासून नगरपालिका महापालिकांच्या निवडणुकाच घेण्यात आल्या नाहीत. विशेष म्हणजे सध्या या संस्थांचा कारभार प्रशासनाकडून पाहिला जात आहे. यासंदर्भाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकाराच्या प्रश्नावर उत्तर देताना कालावधी सांगितला.  

ते म्हणाले ''मला असं वाटतं की, जानेवारीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भाने अंतिम सुनावणी ठेवलेली आहे. आम्ही देखील याबाबत सातत्याने विनंती केली आहे, मला अशी अपेक्षा आहे की, जानेवारी महिन्यातच सर्वोच्च न्यायालय याप्रकरणी अंतिम सुनावणी घेऊन निकाल देईल. त्यानंतर, जो काही वेळ असेल तो घेऊन निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील, अर्थात निवडणुकांच्या तारखा ठरवायचा अधिकार हा आमचा नसून सर्वोच्च न्यायालयाचा आहे,'' आम्ही देखील लवकरात लवकर निवडणुका व्हाव्यात हे पाहत आहोत, असेही फडणवीसांनी सांगितले.

No comments:

Post a Comment