Wednesday, October 28, 2026

मणक्याच्या गंभीर विकृतीने ग्रस्त ४ मुलांना ‘कृष्णा’त मिळाले नवे आयुष्य! १५-२० लाखांची शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत

वेध माझा ऑनलाइन।
: मणक्याच्या गंभीर विकृतीने ग्रस्त असलेल्या चार शालेय मुलांसाठी कृष्णा हॉस्पिटलमधील ‘स्कोलियोसिस शस्त्रक्रिया अभियान’ नवा आशेचा किरण ठरले आहे. कृष्णा विश्व विद्यापीठ आणि अमेरिकेतील ‘स्टँडिंग स्ट्रेट मिशन’ संस्थेच्या सहकार्यातून, कृष्णा हॉस्पिटलमध्ये चार शालेय मुलांवर प्रत्येकी १५ ते २० लाख रुपये खर्चाची शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आली. यामुळे या चारही मुलांना जगण्याचा नवा आधार मिळाला आहे. 

मानवी शरीराला आधार देणारा आणि शरीराचा समतोल राखणारा मणका हा शरीरातील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. मात्र मणक्याच्या हाडांमध्ये विकृती निर्माण झाल्यास शरीराची ठेवण, हालचाली आणि संतुलन यांवर परिणाम होऊ शकतो. विकृती गंभीर स्वरूपाची असल्यास छातीच्या पोकळीतील जागा कमी होऊन, हृदय आणि फुफ्फुसांच्या कार्यावरही परिणाम होण्याची शक्यता असते. 

मणक्याच्या विकृतींपैकी ‘स्कोलियोसिस’ हा एक महत्त्वाचा विकार आहे. यामध्ये मणका एका बाजूला वाकतो. काही मुलांमध्ये ही विकृती वाढत गेल्यास शारीरिक ठेवणीत बदल होण्याबरोबरच दैनंदिन हालचाली आणि आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. अशा गंभीर विकृतींवर शस्त्रक्रिया करणे हे अत्यंत गुंतागुंतीचे असून, यासाठी महागडे प्रत्यारोपण साहित्य आवश्यक असते. त्यामुळे सामान्य रुग्णांपुढे मोठे आव्हान उभे राहते. 

अशा रुग्णांना आधार देण्यासाठी कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा हॉस्पिटलच्या न्यूरोसर्जरी विभागामार्फत अमेरिकेतील ‘स्टँडिंग स्ट्रेट मिशन’ संस्थेच्या सहकार्याने, मणक्याच्या गंभीर विकृतींनी ग्रस्त रुग्णांसाठी वर्षातून दोन वेळा मोफत उपचार शिबिरे आयोजित केली जातात. 

दिनांक २१ ते २४ ऑक्टोबरदरम्यान कृष्णा हॉस्पिटलमध्ये आयोजित विशेष शिबिरात २० हून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी आवश्यक उपचारांची गरज असलेल्या चार शालेय मुलांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. प्रत्येक शस्त्रक्रियेसाठी साधारण १५ ते २० लाख रुपये खर्च होत असताना, या सर्व शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करुन, या रुग्णांच्या कुटुंबांना मोठा दिलासा देण्यात आला. 

‘कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सेस’मध्ये मणक्याचे अनुभवी शल्यचिकित्सक, भूलतज्ज्ञ आणि फिजिओथेरपिस्ट यांच्या समन्वयातून रुग्णांची तपासणी, उपचारांचे नियोजन आणि शस्त्रक्रिया करण्यात आली. अनुभवी शल्यचिकित्सक, प्रगत इमेजिंग सुविधा, अत्याधुनिक मज्जासंस्था निरीक्षण यंत्रणा आणि आधुनिक शस्त्रक्रियागृहांच्या उपलब्धतेमुळे गुंतागुंतीची शस्त्रक्रिया सुरक्षितपणे पार पडल्याचे न्यूरोसायन्स विभागाचे प्रमुख डॉ. जी. व्ही. रामदास यांनी सांगितले. 

कृष्णा हॉस्पिटलमध्ये मार्च २०२४ पासून सुरू असलेल्या या उपक्रमांतर्गत आतापर्यंत एकूण १९ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. अमेरिकेतील डॉ. रवी बैन्स यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या ‘स्टँडिंग स्ट्रेट मिशन’ या स्वयंसेवी संस्थेचे सहकार्य या उपक्रमाला लाभत असून, यामुळे अनेक गरजू कुटुंबांना या अभियानामुळे मोठा आर्थिक दिलासा मिळत आहे.



महाराष्ट्रासह कर्नाटक, 
गोव्यातील रुग्णांनाही लाभ
मणक्याच्या गुंतागुंतीच्या विकारांवरील उपचारांसाठी आवश्यक असलेल्या आधुनिक सुविधा कृष्णा हॉस्पिटलच्या न्यूरोसायन्सेस विभागात उपलब्ध आहेत. त्यामुळे या उपक्रमाचा लाभ केवळ महाराष्ट्रातील रुग्णांनाच नव्हे, तर शेजारील कर्नाटक आणि गोवा राज्यांतील रुग्णांनाही होत आहे. आर्थिक अडचणींमुळे मुलांच्या उपचारांचे स्वप्न अपूर्ण राहू नये, या भावनेतून सुरू असलेला कृष्णा विश्व विद्यापीठ आणि ‘स्टँडिंग स्ट्रेट मिशन’चा हा संयुक्त उपक्रम गरजू कुटुंबांसाठी आशेचा नवा किरण ठरला आहे.

No comments:

Post a Comment