सातारा दि.19 (जिमाका): कोविड-19 आजाराचे प्रतिबंधक उपायोजनामध्ये कंटेमेंन्ट झोन करणे ही महत्वाची बाब आहे. या अनुषंगाने शहरी भागासाठी गठीत करण्यात आलेल्या प्रभाग समित्या व ग्रामीण भागासाठी गठीत करण्यात आलेल्या ग्रामस्तरीय समिती आणि संबंधित विभागांनी कसे काम करावे याबाबतचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी परिपत्रक जारी केले आहे.
या परिपत्रकानुसार कोविड संक्रमित झालेल्या रुग्णांचा परिसर तात्काळ कंटेमेंन्ट झोन म्हणून घोषीत करुन संपूर्ण परिसर सॅनिटायझर करावा. कंटेमेंन्ट झोन घोषीत करतावेळी तेथील परिसर, इमारत, गल्ली इ. चा विचार करुन सुक्ष्म कंटेमेंन्ट झोन घोषीत करावा. कंटेमेंन्ट झोनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व बाबींना मनाई करावी व त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे पार पाडण्याकामी ग्रामस्तरीय, शहरी भागातील समितीने काटेकोरपणे नियोजन करावे. कंटेमेंन्ट झोन घोषीत झालेल्या परिसरामध्ये सर्व घरांचे सर्वेक्षण करावे. यासाठी किमान 3 व्यक्तींचे पथक नेमण्यात यावे आणि प्रत्येक 5 पथकामागे 1 पथकप्रमुख नेमण्यात यावे.
कोविड संक्रमित रुग्णांची संख्या ज्या भागात, क्षेत्रात, ठिकाणी जास्त आहे अशा ठिकाणी दैनंदिन पुरवठा करणारे दूध विक्रेता, भाजी विक्रेता, दुकानदार यांची तात्काळ रॅट, आरटीपीसीआर टेस्ट करावी. मास्क वापरणे, सामाजिक अंतर पाळणे, वेळोवेळी हाथ सॅनिटाईझ करण्याबाबत प्रबोधन करावे आणि जे नागरिक नियम पाळत नाहीत अशा नागरिकांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करावी. घर टू घर सर्व्हेक्षण करता वेळी गरोदर स्त्रिया, दुर्धर आजार, आयएलआय, सारी रुग्ण यांची वर्गवारी करुन त्यांना पुढील उपचारांसाठी मार्गदर्शन करावे. घोषीत करण्यात आलेल्या कंटेमेंन्ट झोन बाबतश आवश्यक ती स्वच्छता राखणे, वेळोवेळी परिसर सॅनिटायझर करण्यात यावा. घर टू घर मध्ये सर्वेक्षण झालेल्या नागरिकांची माहिती त्या त्या कार्यक्षेत्राचे वैद्यकीय अधिकारी यांना तात्काळ अद्यावत करावी असे परिपत्रकात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी नमूद केले आहे.
0000
No comments:
Post a Comment