माझी पार्श्वभूमी कराडला माहीत आहे आणि तुमचीही माहीत आहे. ज्यांनी कधी कष्टच केले नाहीत आणि ज्यांचे धंदेच टक्केवारीचे आहेत अशांनी आमची माप काढावीत हे हास्यास्पदच आहे. आम्हाला लोकांनी निवडून देऊन पालिकेत पाठवलंय, तुम्ही नापास होऊन पालिकेत आला आहात हा फरक लक्षात ठेवून यापुढे जबाबदारीने शहराचे काम करा. असा खणखणीत पलटवार जेष्ठ नगरसेवक विनायक पावसकर यांनी जनशक्तीचे गटनेते राजेंद्रसिह यादव यांच्यावर आयोजित पत्रकार परिषदेत लगावला.
जनशक्ती आघाडीचे गटनेते राजेंद्र यादव यांनी काही दिवसांपूर्वी पावसकर व नगराध्यक्षा सौ रोहिणी शिंदे यांच्यावर टक्केवारीचा’ आरोप केला होता त्याचे उत्तर देण्यासाठी भाजपाने पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते त्यावेळी नगरसेवक पावसकर बोलत होते.यावेळी नगराध्यक्षा सौ रोहिणी शिंदे, नगरसेवक सुहास जगताप,फारूक पटवेकर,नगरसेविका विद्या पावसकर यांची उपस्थिती होती.
यावेळचे पालिकेचे बजेट सादर झाल्यानंतर पालिकेतील सत्ताधारी जनशक्ती आघाडी आणि भाजपा यांच्यात शाब्दिक वाकयुद्ध सुरू आहे बजेट च्या सभेतून पहिल्यांदा वाद कोणी सुरू केला? नेमकं सत्ताधारी कोण? सूचना कोण वाचणार ? अशा विषयावरून आरोप प्रत्यारोप होत असताना आता व्यक्तिगत पातळीवर हे आरोप होऊ लागले आहेत यावरून वार पलटवार करणार्या पत्रकार परिषदा दोन्ही बाजूने घेण्याचे सुरू आहे.
दरम्यान आजच्या झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना पावसकर पुढे म्हणाले, माजी नगरसेवक निवास पवार-पोळ यांचे निधन झाल्यानंतर त्याठिकाणी लागलेल्या पोट निवडणुकीतून राजेंद्र यादव याना निवडून आणण्यासाठी मी आणि माझे सहकारी त्यावेळी प्रयत्नशील होतो. निवडून आल्यावर त्यांनी आमचा हार देखील स्वीकारला त्यानंतर मात्र आम्हाला फसवत ते त्यावेळच्या विरोधकांबरोबर गेले म्हणजे त्यांनाच कसली नीतिमत्ता नाही आणि हे आमच्याबद्दल तत्वाच्या गोष्टी बोलतात, हे त्यांना शोभत का? माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण याचा चेहरा वापरून त्यांनी निवडणूक लढवली आणि त्यांनाही त्यानंतर फसवले. यावरून यांची नीतिमत्ता कळते आमच्या नीतिमतेवर बोलण्याचा त्यांना अधिकारच काय? आमदारकीच त्यांचं स्वप्न अपूर्ण राहीलय त्यामुळं ते शहराला त्रास देत आहेत. याठिकाणी आमदार, खासदार पालकमंत्री आहेत त्यांना शहराची नक्कीच काळजी आहे त्यांना डावलून हे स्मार्ट सिटी करण्याची भाषा करत आहेत, ज्यांना आपला वार्ड नीट करता आला नाही त्यांना स्मार्ट सिटीची भाषा शोभते का?
जनशक्ती आघाडीचे गटनेते असे हे स्वतःला म्हणतात मग, त्या आघाडीचे नेते अरुण जाधव यांना कधी त्यांनी विश्वासात घेतले का? नुसतं नाव त्यांचं घ्यायचं... आणि पालिकेत बोर्डावर यशवंत आघाडीचे गटनेते अस लिहायचे... हे लोकांना कळत नाही का? स्वतःच्या फायद्यासाठी गावच नुकसान करणारी बुद्धी आमची नाही. इलेक्शन आलं की गावात यायचं आणि आर्थिक पाठिंब्यासाठीचे निर्धार मेळावे घ्यायचे अशांनी आम्हाला नैतिकता शिकवू नये. असेही पावसकर म्हणाले.
उपसूचना लेखी स्वरूपात आमच्याकडे अद्याप दिली गेली नाही ती नगराध्यक्षांकडे सूचक अनुमोदन यांचे सहिसहित यावी लागते बजेट पत्रकारांसमोर कोण सादर करते का? बजेटवर झालेली चर्चा उपसुचनेत घेतली आहे का? बोलायचं एक आणि करायचं एक हे विरोधकांचे धंदे आहेत.
तीन कोटी पार्किंग करिता आलेला निधी परत का गेला? विक्रम पावसकरांनी गावासाठी आणलेला निधी यांनी आपल्या सध्याच्या सत्तेचा वापर करत काही वार्डापुरताच तो वापरण्याबाबत विचार केला. म्हणजे यांना गावाची काळजी आहे का केवळ निवडणुकीपुरता विचार आहे... हे आता लोकांना समजतंय...
आम्ही सोमवार पेठेत सीसीटीव्ही बसवले त्यात त्यांच्या पोटात का दुखतंय? असा सवाल करत पावसकर म्हणाले शहराच्या संबंधीची अनेक प्रपोझल्स का तशीच ठेवली गेली? त्यावेळचे मुख्याधिकारी डांगे यांचे बरोबर निधी दाबून ठेवायला हेच पुढे होते का ? असा धक्कादायक सवालही पावसकर यांनी यावेळी केला.
नगराध्यक्षा सौ.रोहिणी शिंदे यावेळी म्हणाल्या सत्ता असेल तर बरोबर नसेल तर विरोधात म्हणजे खोबर तिकडे चांगभलं अशी प्रवृत्ती विरोधकांची आहे. मला जनतेनी निवडून दिलंय माझा राजीनामा मागायचा अधिकार विरोधकांना नाही. ज्यांना लोकांनी घरी बसवलय तेच माझा राजीनामा मागतायत. कोरोनाकाळात लोकांसाठी मी काम केलं... तुम्हाला कोणी अडवलं होत का? पण तुम्ही काहीच केलं नाही फक्त आमची माप काढण्यातच तुम्ही वेळ घालवला यापुढेही तुम्ही आमच्यावर अशीच टीका करत बसा आम्ही मात्र शहरासाठी विकासकामेच करत राहणार...असेही त्या म्हणाल्या...
No comments:
Post a Comment