Tuesday, March 23, 2021

विरोधकाकडून बिनबुडाचे आरोप होतायत ; डॉ अतुल भोसले यांनी टीका


कराड
कृष्णा कारखान्याला यंदाच्या ५ वर्षांच्या काळात खऱ्या अर्थाने उर्जितावस्था प्राप्त झाली असतानाही, विरोधक मात्र बिनबुडाचे आरोप करत सुटले आहेत. या विरोधी गटाच्या मागील संचालक मंडळाने सत्तेचा उपयोग फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी केल्यामुळेच त्यांना सभासदांनी घरी बसविले, अशी टीका कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले यांनी केली. येरवळे व शिंदेवाडी-विंग (ता. कराड) येथे य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या सभासद संपर्क बैठकीत ते बोलत होते.

बैठकीत बोलताना डॉ. भोसले पुढे म्हणाले, की. चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी पाच वर्षे कारखान्याचा कारभार पारदर्शी पद्धतीने केला. त्यामुळे विरोधकांना बोलायलासुद्धा मुद्दा न  राहिल्याने, विरोधक आता बिनबुडाचे आरोप करीत सुटले आहेत. सभासदांनी या पाच वर्षाचा कारभार जवळून बघितला आहे. गेल्या ५ वर्षात सभासदांना चांगला दर, मोफत साखर मिळाली. पण विरोधकांना या चांगल्या गोष्टी बहुदा दिसत नाहीत. खरंतर विरोधकांनी मुळातच भ्रष्ट कारभार केल्यामुळे त्यांची दृष्टी तशी बनली असावी. कारखान्याला तोडणी वाहतुकीसाठी दरवर्षी २० कोटी लागतात. पण विरोधकांच्या सत्तेच्या काळात त्यांना ६० कोटी लागत होते. मग वरचे ४० कोटी कोण वापरत होते? त्यांच्या काळात साखर उतारा एक टक्का कमी होता. रस ओढ्याला जाईपर्यंत यांचा कारभार किती आंधळा होता, यावरून लक्षात येते. आम्ही जसे पाच वर्षात काय केले सांगतोय, तसे ते का सांगत नाहीत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 
यावेळी संचालक दयानंद पाटील, उपसरपंच अशोकराव जाधव, सुनील यादव, विलासराव यादव, ॲड. आनंदराव यादव, राहुल यादव, शिंदेवाडीचे उपसरपंच बाबासाहेब पवार, सुरेश शिंदे, निवासराव शिंदे, ग्रामपंचायत सदस्या अंजना साळुंखे, सुनंदा शिंदे उपस्थित होते.

सहकार पॅनेलमध्ये मान्यवरांचा जाहीर प्रवेश
-----------------------------------------------------------
येरवळे (ता. कराड) येथे आयोजित य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या सभासद संपर्क बैठकीत सेवा सोसायटीचे माजी अध्यक्ष सयाजी यादव, सोसायटीचे अध्यक्ष भरत यादव, माजी सरपंच नरेंद्र पाटील, रमेश लोकरे, बाबुराव यादव यांनी स्व. जयवंतराव भोसले सहकार पॅनेलमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

No comments:

Post a Comment