होमगार्ड प्रमुख आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लेटरबॉम्ब टाकल्यानंतर दोन दिवसांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आज आपल्या शासकीय निवसास्थानातून बाहेर पडले. अनिल देशमुख आपल्या ज्ञानेश्वरी या शासकीय निसास्थानाहून बाहेर पडले आणि सह्याद्री अतिथीगृहावर आले. देशमुख आज रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास सह्याद्रीवर आले. जवळपास तीन तास ते सह्याद्री अतिथीगृहात होते. सह्याद्री अतिथिगृहावर देशमुख यांच्या आधी कोण गेलं याबाबत माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, तिथे काहीतरी महत्त्वाची चर्चा किंवा खलबतं झाल्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं शासकीय निवासस्थान अनिल देशमुख यांच्या निवासस्थानापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. तिथे देखील अनिल देशमुख त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी जाऊ शकले असते. मात्र, असं नेमकं काय कारण असेल की त्यांना सह्याद्री अतिथीगृहावर येणं भाग पडलं. सह्याद्री अतिथीगृहाबाहेर त्यांची मर्सिडीज गाडी उभी होती. सह्याद्री अतिथीगृहात देशमुख यांच्यासोबत नेमकं कोण होतं, यावरुन विविध तर्क-वितर्क लढवले जात आहेत
परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवत अनिल देशमुख यांची तक्रार केली. अनिल देशमुख यांनी पोलीस सहायक यांना 100 कोटी रुपये वसूल करायला सांगितले, असा आरोप त्यांनी पत्रात केला. हा बाब उघड झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. विरोधक महाविकास आघाडी सरकारवर तुटून पडले. या दरम्यानच्या काळात महाविकास आघाडी सरकारच्या निर्मितीत महत्त्वाचे दुवा ठरलेले शिवसेना नेते संजय राऊत यांनीदेखील सत्ताधाऱ्यांनी आत्मपरिक्षण करण्याची वेळ आलीय, असं म्हटलं. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर दबाव वाढला. विरोधकांकडून अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन देशमुखांचा राजीनामा मागितला.
एकीकडे विरोधकांकडून घणाघात सुरु असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील घडामोडींना वेग आला होता. सुरुवातीला राष्ट्रवादीचा एक बडा नेता आता गृहमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारणार, अशी चर्चा सुरु होती. तेवढ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन राजीनामा मागण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना असल्याचं म्हणत राजीनाम्याच्या चेंडू मुख्यमंत्र्याकडे टाकला. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, अजित पवार दिल्लीला गेले. तिथे शरद पवार यांच्यासोबत त्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर जयंत पाटील यांनी अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही, असं म्हटलं. त्यानंतर शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन अनिल देशमुख यांची पाठराखण केली.
No comments:
Post a Comment